८६ गावांमध्ये होणार नागरिक सुविधा केंद्र
By admin | Published: June 12, 2014 12:02 AM2014-06-12T00:02:49+5:302014-06-12T00:02:49+5:30
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार
गडचिरोली : जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याने नागरिकांचा शारीरिक व मानसिक श्रम वाचण्यास मदत होऊन पैशाचीही बचत होणार आहे.
देशातल्या संपूर्ण ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू झाले आहेत. एवढेच नाही तर शासनाकडून मिळणारे अनुदानही सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात भविष्यात जमा केले जाणार आहे. हे सर्व काम संग्राम केंद्राच्या मदतीने सुरू आहे. या संग्राम केंद्राला बहुविध सुविधा देणारे केंद्र बनविण्यासाठी सरकारची धडपड आहे.
जिल्ह्यातील ८६ संग्राम केंद्रामध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. या केंद्रामध्ये नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. संग्रामचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल इंगुलकर व जिल्हा समन्वयक शंभू गेडाम यांच्या उपस्थितीत तालुका समन्वयकांची बुधवारी सभा झाली. या सभेत ८६ संग्राम केंद्रामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या सुविधा केंद्रामध्ये मोबाईल रिचार्ज, टी. व्ही. रिचार्ज, रेल्वे आरक्षण, बस आरक्षण, पॅन कार्ड बनविणे, पासपोर्ट तयार करणे, विद्युत बील भरणे, ई - लर्निग , विमानाचे रिझर्व्हेशन करणे यासारख्या अत्यंत महत्वाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराचा रस्ता धरावा लागत होता. १० रूपयाच्या कामासाठी ५० रूपयाचे तिकिट व २०० रूपये रोजी बुडवावी लागत होती. या सर्व सुविधा आता गावातच मिळणार असल्याने नागरिकांचा श्रम वाचण्यास मदत होणार आहे. संग्राम केंद्राच्या माध्यमातून आवश्यक सुविधा मिळणार असल्याने नागरिकांचे शहरात होणारे स्थलांतरणारही थांबण्यास मदत होणार आहे. या सर्व सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सॉफ्टवेअर संग्राम केंद्रातील संगणकामध्ये टाकण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व सोयीसुविधा अत्यंत कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे सर्व काम अत्यंत गतीने होण्यासाठी जिल्हा समन्वयक शंभू गेडाम, तालुका समन्वयक व संग्राम केंद्रातील संगणक परिचालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. (नगर प्रतिनिधी)