८८९ जवानांचा गडचिरोलीत देहदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:50 AM2018-08-10T04:50:15+5:302018-08-10T04:50:28+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तब्बल ८८९ जवानांनी येथे मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला.
गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तब्बल ८८९ जवानांनी येथे मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. जवानांचा हा उत्साह पाहून सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार यांनीसुद्धा हा संकल्प करून ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’देशसेवा करण्यास तयार असल्याचे दाखवून दिले. गडचिरोलीतील सीआरपीएफ कॅम्पमध्ये गुरूवारी (दि.९) झालेल्या कार्यक्रमात हा संकल्प करणाऱ्या काही जवानांना डीआयजी राजकुमार यांच्या हस्ते देहदान कार्डांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहानिरीक्षक टी. शेखर व इतर अधिकारी उपस्थित होते.
नक्षलविरोधी अभियानासाठी या जिल्ह्यात सीआरपीएफच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. देहदानाचा संकल्प करणाºयांमध्ये त्या पाचही बटालियनच्या जवानांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून या जवानांकडून देहदानाचा संकल्प केला जात आहे. त्यात आतापर्यंत ८८९ जवानांनी संकल्प करून मृत्यूनंतरही आपल्या अवयवांचा उपयोग गरजवंतांना करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबाबतचे अर्जही त्यांनी भरून दिले आहेत. कार्यक्रमाला सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमांडंट जिआऊ सिंंह, ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना, ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवा संकरे, ९ व्या बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, द्वितीय कमांडंट दीपककुमार साहू, द्वितीय कमांडंट कुलदीप खुराणा, टी.के.सोळंकी आदी उपस्थित होते.
>जिंदगी के साथ, जिंदगी के बाद भी...
यावेळी पोलीस महानिरीक्षक राजकुमार म्हणाले, सीआरपीएफचे जवान जिवंतपणी देशाच्या सुरक्षेत योगदान देत आहेत आणि मृत्यूनंतरही त्यांनी आपले शरीर लोकांच्या कामी यावे असा संकल्प केला, ही आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे. महाराष्टÑात तैनात सुमारे १५०० जवानांनी देहदानाचा संकल्प केल्याचे ते म्हणाले.