वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:24 PM2018-08-27T22:24:07+5:302018-08-27T22:24:44+5:30

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या वार्षिक सरासरीच्या (अपेक्षित पावसाच्या) सुमारे ८८ टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिना संपायला आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. कधीकधी याही महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

88% of annual rainfall | वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस

वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस

Next
ठळक मुद्दे११९४.१ मिमी पाऊस पडला : पावसाचा जोर सुरूच; काही तालुके मात्र माघारलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या वार्षिक सरासरीच्या (अपेक्षित पावसाच्या) सुमारे ८८ टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिना संपायला आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. कधीकधी याही महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशभरात यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत अगदी सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यंतरीचा १० ते १५ दिवसांचा कालावधी वगळता अगदी जून महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. दररोज पडणाºया पावसामुळे शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तर धान उत्पादक शेतकरी मात्र या पावसामुळे समाधानी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १३५४.७ मिमी सरासरी पाऊस पडतो. २७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सुमारे ११९४.१ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८८.१ टक्के पाऊस पडला असून केवळ १२ टक्के पाऊस पडायचा आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळा समजला जातो. ३० सप्टेंबरला पुन्हा एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. १ जून ते २७ आॅगस्ट या कालावधीपर्यंत सरासरी १०८१.२ मिमी पाऊस पडतो. यावर्षी २७ आॅगस्टपर्यंत सुमारे ११९४.१ मिमी पाऊस पडला आहे. २७ आॅगस्टपर्यंत पडणाºया सरासरी पावसाच्या ११०.४ मिमी पाऊस झाला आहे. सातत्याने पडणाºया पावसाचा परिणाम कापूस, सोयाबीन, तूर पिकावर होण्यास सुरुवात झाली आहे. सातत्याने असलेल्या ओलाव्यामुळे या पिकांची वाढ खुंटली आहे. धानपिकाला मात्र पावसाचा फायदा होत आहे. अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांचे धानपीक हिरवेगार आहे. सर्वच तलाव, बोड्या पूर्ण भरल्या आहेत. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.
अहेरी, सिरोंचा, भामरागड तालुक्यांनी गाठली सरासरी
यावर्षी अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांनी वार्षिक सरासरी २७ आॅगस्टपर्यंत गाठली आहे. अहेरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १३२०.७ मिमी पाऊस पडतो. यावर्षी २७ आॅगस्टपर्यंत १४८८.२ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या ११२.७ मिमी पाऊस झाला आहे. तसेच सिरोंचा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ११४९.७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी १४८४.७ मिमी पडला आहे. वार्षिक सरासरीच्या १२९.१ टक्के पाऊस झाला. भामरागड तालुक्यात ३० सप्टेंबरपर्यंत १३०३.६ मिमी पाऊस अपेक्षित आहे. या तालुक्यात प्रत्यक्षात १५०७.९ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक पावसाच्या ११५.७ टक्के पाऊस झाला आहे. मुलचेरा तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या ९९.९ टक्के पाऊस पडला आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तरीही याही तालुक्यातील पावसाची आकडेवारी ७० टक्केपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत याही तालुक्यांमध्ये सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.
सरासरीच्या अधिक पावसाची शक्यता
सप्टेंबर महिना संपायला आणखी पूर्ण महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. या महिनाभरात पाऊस झाल्यास सरासरी पावसाच्या १२० ते १३० टक्के पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 88% of annual rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.