१३ सरपंचांसह ८८ सदस्य अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:57 AM2018-09-27T00:57:43+5:302018-09-27T00:58:16+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) मतदान झाले. यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिलशील असलेल्या २० पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह ८८ सदस्य अविरोध निवडून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) मतदान झाले. यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिलशील असलेल्या २० पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह ८८ सदस्य अविरोध निवडून आले. एकाच निवडणुकीत एवढ्या संख्येने सरपंच आणि सदस्य निवडून येण्याची ही बहुदा जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली.
बुधवारी मतदान झालेल्या चार ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ७३.०८ टक्के मतदान झाले. त्यात अहेरी तालुक्यातील आवलसरी येथे ८३.११ टक्के, तर एटापल्ली तालुक्यातील सेवारी येथे ६५.६९ टक्के, सरखेडा येथे ७१.७३ टक्के आणि वडसा खुर्द येथे ७१.८० टक्के मतदान झाले. अतिसंवेदनशिल भाग असतानाही या मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही. सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यात सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाली. जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षली दहशतीमुळे आतापर्यंत अनेक गावांत बºयाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणी अर्जच भरत नव्हते. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात प्रशासनाच्या अधिकाºयांना यश आले. तरीही २० पैकी ३ ग्रामपंचायतींमध्ये यावेळीही कोणीच नामांकन दाखल केले नाही. उर्वरित १७ पैकी १३ ग्रामपंचायतीत एकेका उमेदवाराचे नामांकन आल्यामुळे त्या जागा अविरोध निवडल्या गेल्या तर ४ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी प्रत्यक्ष मतदान झाले.
आवलमरी ग्रामपंचायतीत एका सदस्याची अविरोध निवड झाली. सेवारी ग्रामपंचायतीमध्ये एक सरपंच व दोन सदस्यांसाठी तीन प्रभागात निवडणूक झाली. सरखेडा ग्रामपंचायतीत तीन प्रभागात एक सरपंच व सहा सदस्य तसेच वडधा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये एक सरपंच व सहा सदस्यांसाठी तीन प्रभागात मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. चार ग्रामपंचायतींना २१ सदस्य व चार सरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.
हे आहेत अविरोध ठरलेले सरपंच
टेकला- मडावी रासो चिन्ना, नेलगुंडा- मज्जी भारती काशिनाथ, बोटनगुंडी- मडावी तारा मुत्ता, फोदेवाडा- रोषनी दामोधर फोदाळी, होडरी- हबका मिनाक्षी अशोक, धिरंगी- मुहंदा अविनाश पेका, कुव्वाकोडी- काळंगा बासू कट्टा, परायनार- कुसराम सरिता कैलास, मुगनेर- कोवा मनिराम रामजी, पिटेसूर- ताडामी चैनुराम गांडोराम, मोठा झेलिया- मडावी गांगसाय सुखराम, जवेली बु.- हिचामी दामजी रावजी
मतदान केंद्रावर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर
अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील तीनही गावांचे मतदान यंत्र हेलिकॉप्टरने पेठा बेस कॅम्पवर पोहचवण्यात आले. गुरूवारी हे मतदान यंत्र सकाळी एटापल्लीला पोहोचवून मतमोजणी केली जाईल, असे निवडणूक अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.