९५ दुर्गम गावांमध्ये पोहोचणार वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 10:11 PM2017-11-05T22:11:16+5:302017-11-05T22:11:26+5:30

दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१९.२२ किमीच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

9 5 Power to reach in remote villages | ९५ दुर्गम गावांमध्ये पोहोचणार वीज

९५ दुर्गम गावांमध्ये पोहोचणार वीज

googlenewsNext
ठळक मुद्देकाम प्रगतीपथावर : ४२० किमीच्या नवीन वीज वाहिन्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१९.२२ किमीच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ३३५.७७ किमीची उच्चदाब वाहिनी व ८३.४५ किमीची लघुदाब वाहिनी यांचा समावेश असून काही ठिकाणी वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या नवीन वाहिन्यांमुळे आजपर्यंत कधीच वीज न पोहोचलेल्या ९५ गावांमध्ये वीज पोहोचणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्याप्त व दुर्गम आहे. जंगलातून वीज वाहिनीचे बांधकाम करताना वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. बºयाचवेळा वन विभाग परवानगी देत नाही. त्यामुळे वीज वाहिनीचे काम करताना अडचण निर्माण होत असल्याने काही गावांमध्ये अजुनही वीज पोहोचली नाही. देशातील प्रत्येक गाव व प्रत्येक घरी वीज पोहोचली पाहिजे, या उद्देशाने केंद्र शासनाने दिनदयाल उपाध्याय, ग्रामज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्या गावांपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांपर्यंत वीज वाहिनीचे बांधकाम करून वीज पोहोचविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. २०१७-१८ या वर्षात जिल्हाभरात सुमारे ३३५.७७ किमीच्या उच्चदाब वाहिनीचे व ८३.४५ किमीच्या लघुदाब वाहिनीचे काम केले जाणार आहे. या वाहिन्यांमुळे नवीन गावे, टोल्या, वस्त्या जोडल्या जाणार आहेत.
पावसाळ्यादरम्यान नदी, नाल्यांमुळे बांधकाम करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान काम संथगतीने सुरू होते. मात्र पावसाळा संपताच वीज वाहिन्या उभारण्याच्या कामाला गती आली असून आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने वीज विभाग कामाला लागला आहे.
२७३ नवीन रोहित्र बसणार
वाढती लोकसंख्या व विजेचा वापर यामुळे जास्त क्षमतेचे तसेच नवीन रोहित्र बसविणे आवश्यक झाले आहे. काही जुन्या रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे गरजेचे झाले आहेत. याच योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २७३ नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात आठ, आरमोरी तालुक्यात ४१, देसाईगंज तालुक्यात ६२, कुरखेडा ३३, कोरची ४, धानोरा ८, अहेरी १०, मुलचेरा तालुक्यात ४, चामोर्शी तालुक्यात ५४, एटापल्ली तालुक्यात ६, भामरागड तालुक्यात ४, सिरोंचा तालुक्यात ३९ रोहित्र बसविले जाणार आहेत. कुरखेडा, धानोरा, अहेरी तालुक्यात प्रत्येकी एक नवीन उपकेंद्र बसविले जाणार आहे.
५० कोटींचा खर्च
तीन उपकेंद्रांची निर्मिती, दोन उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ, २७३ नवीन रोहित्र, सात वाहिन्यांचे विलगिकरण, ३३५.७७ किमीच्या नवीन उच्चदाब वाहिन्या, ८३.४५ किमीच्या लघुदाब वाहिन्या, २६ हजार ११३ घरगुती वीज जोडणी आदींसाठी सुमारे ४० कोटी ८० लाख ४२ हजार रूपयांचा खर्च येणार आहे.

दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित कामांना सुरूवात झाली आहे. कालावधी संपण्याच्या पूर्वी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने गती दिली जात आहे. नवीन कामांमुळे विजेची समस्या दूर होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली

Web Title: 9 5 Power to reach in remote villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.