९६ टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:41 AM2019-02-11T00:41:46+5:302019-02-11T00:42:20+5:30
शाळेमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, या विषयीचे स्वयंमूल्यमापन मुख्याध्यापकांना करायचे होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार ८४ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ९५३ शाळांनी स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे तर ५१ शाळांची प्रक्रिया सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शाळेमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, या विषयीचे स्वयंमूल्यमापन मुख्याध्यापकांना करायचे होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार ८४ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ९५३ शाळांनी स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे तर ५१ शाळांची प्रक्रिया सुरू आहे.
एखाद्या संस्थेकडे असलेल्या सोयीसुविधांवरून त्या संस्थेला आयएसओ मानांकन दिले जाते. जिल्हा परिषदेच्या काही शाळा सुध्दा अतिशय चांगल्या आहेत. या शाळांकडे जवळपास सर्वच सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचाही दर्जा खासगी शाळांच्या तुलनेत अतिशय चांगला आहे. शाळेमध्ये असलेल्या सोयीसुविधांचे मूल्यांकन व्हावे, या उद्देशाने शासनाने शाळा सिध्दी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेमध्ये कोणत्या भौतिक, शैक्षणिक सुविधा आहेत, याची माहिती मुख्याध्यापकाला स्वत:च भरायची आहे. त्यांनी भरलेल्या माहितीवरून त्या शाळेला ग्रेड प्राप्त होते. त्यामुळे या माहितीला स्वयंमूल्यांकन असे संबोधण्यात आले आहे. शाळा सिध्दीमध्ये माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापकांनी सुरूवातीला दिरंगाई केली. मात्र आता बहुतांश मुख्याध्यापकांनी माहिती भरली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या एकूण २ हजार ८४ शाळा आहेत. त्यापैकी सुमारे १ हजार ९५३ शाळांनी परिपूर्ण माहिती भरली आहे. ५१ शाळांकडून माहिती भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या शाळांकडूनही पूर्ण माहिती भरण्याची अपेक्षा आहे.
काही शाळांना माहिती भरताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे माहिती भरण्यास विलंब होत आहे.
८० शाळांनी अजूनपर्यंत माहिती भरण्यास सुरूवात केली नसल्याचे शाळा सिध्दीच्या वेबसाईटवर दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडले आहेत. या बंद शाळांचा ८० शाळांमध्ये समावेश आहे. एकूण माहिती भरण्याच्या ९६.१६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
राज्यात सहावा क्रमांक
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी सुमारे ९६.१६ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात गडचिरोली जिल्ह्याचा राज्यात सहावा क्रमांक आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण गावांपैकी अर्ध्याहून अधिक गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. तरीही शिक्षकांनी तालुकास्थळी येऊन माहिती भरली आहे. काही तालुकास्थळीसुध्दा इंटरनेटची गती फारशी राहत नाही. अशाही परिस्थितीत सुमारे ९६ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी ही बाब प्रेरणादायी ठरणारी आहे.