९८ बसगाड्या राहणार मार्कंडा यात्रा स्पेशल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:11 AM2018-02-01T00:11:13+5:302018-02-01T00:13:02+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागातर्फे बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
संतोष सुरपाम/लोमेश बुरांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्र्कंडादेव/चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागातर्फे बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल ९८ बसेस शिवभक्तांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहे.
चंद्रपूर बस आगारातर्फे २०, ब्रह्मपुरी आगारातर्फे २४, गडचिरोली आगारातर्फे ३५ व अहेरी आगारातर्फे १९ अशा एकूण ९८ बसगाड्या मार्कंडा यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात येणार आहे. चंद्रपूर येथून मार्कंडासाठी २० बसेस सोडण्यात येणार असून यामध्ये १० विनावाहक व १० वाहकासह बसगाड्या सोडण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी आगारातर्फे मूल-मार्कंडादेव अशा २२ बसगाड्या सोडण्यात येणार असून यामध्ये ८ विनावाहक बसगाड्यांचा समावेश आहे. गडचिरोली आगारातर्फे गडचिरोली ते मार्र्कंडा अशा १८ बसगाड्या चामोर्शी ते मार्कंडा अशा १०, सावली ते साखरी घाट तीन, व्याहाड खुर्द ते साखरी घाट दोन व व्याहाड बुज ते साखरी घाट दोन अशा ३५ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
अहेरी आगारातर्फे कालेश्वर, आष्टी, चपराळा, मार्कंडादेव, व्यंकटापूर व नगरम आदी तिर्थस्थळांच्या यात्रांसाठी १९ बसगाड्या सोडण्यात येणार आहे. यामध्ये आष्टी-मार्कंडा-चपराळा अशा १५, सिरोंचा-नगरम-कालेश्वर अशा दोन व अहेरी येथून व्यंकटपूरसाठी दोन अशा १९ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातर्फे बसगाड्यांसह मनुष्यबळ व नियंत्रण केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. गडचिरोली, चामोर्शी, व्याहाड खुर्द, व्याहाड बुज, सावली व अरततोंडी येथे प्रत्येकी एक नियंत्रण केंद्र राहणार असून १३ नियंत्रण कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. गडचिरोली आगारातर्फे या केंद्राच्या नियंत्रणात ३६ बसगाड्या यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात येणार आहे.
महाशिवरात्री यात्रेदरम्यानच्या बस प्रवाशी वाहतुकीची जबाबदारी एसटीचे विभाग नियंत्रक ए.टी.गव्हाळे यांच्या मार्गदर्शनात विभागीय वाहतूक अधिकारी एन.एस.बेलसरे, आगार व्यवस्थापक व्ही.एल.बावणे यांच्या नियंत्रणात गडचिरोलीचे बसस्थानक प्रमुख पी.एस.सालोटकर, चामोर्शी बसस्थानक प्रमुख एस.ए.चौधरी सांभाळणार आहेत. यात्रेदरम्यान महामंडळातर्फे चालक-वाहकाच्या सुट्या रद्द करण्यात येणार आहे.
ेमार्कंडादेव व साखरी घाटावर तात्पुरते बसस्थानक
गडचिरोली आगारातर्फे ३६ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मार्कंडादेव यात्रेसाठी या बसेस भाविकांकरिता ब्रह्मपुरी, चंद्रपूर, राजुरा, वरोरा, अहेरी, चिमूर आगारातर्फे बसगाड्या सोडण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान मार्कंडादेव व साखरी घाटावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या बसस्थानकात नियंत्रण कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. सदर दोन्ही ठिकाणच्या तात्पुरत्या बसस्थानकावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच बसगाड्यांसाठी आवश्यक इंधनसाठा, यांत्रिकी, स्वच्छक आदी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. येथे पेंडालची व्यवस्था राहणार असून लाऊडस्पीकरद्वारे बसफेऱ्यांचे आवाहन करण्यात येणार आहे. प्रवाशी उपलब्धतेनुसार सदर यात्रेसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याची तजवीज करण्यात येणार आहे.
गडचिरोली, चामोर्शीतही राहणार पेंडालची व्यवस्था
गडचिरोली येथे चामोर्शी मार्गावर पेंडालची व्यवस्था करण्यात येणार असून येथेही तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार आहे. तसेच चामोर्शी बसस्थानकालगत भाविकांसाठी पेंडालची व्यवस्था राहणार आहे.