९ लाख ७५ हजार ७०० रूपयांची दारू जप्त
By Admin | Published: May 17, 2016 01:05 AM2016-05-17T01:05:35+5:302016-05-17T01:05:35+5:30
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. व आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे १५ व १६ मे रोजी जिल्हा पोलीस
कुनघाडा व ठाणेगाव येथे कारवाई : विशेष पथकाने पकडला साठा
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. व आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे १५ व १६ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष दारूबंदी पथकाने ९ लाख ७५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे या परिसरातील दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
१५ मे रोजी ठाणेगाव येथील छत्रपती ताराचंद उपरीकर, प्रेमिला छत्रपती उपरीकर (३०) यांच्याकडे पथकाने धाड घातली. यात विदेशी दारूच्या २४ हजार रूपये किमतीच्या ९६ निपा, गोल्डन गोवा दारूच्या ३३ हजार ६०० रूपयांच्या ३३६ निपा, हार्वड कंपनीच्या २६ हजार रूपये किमतीच्या १३० निपा तसेच ९ हजार २०० रूपये किमतीच्या ८६ बॉटल व देशी दारूच्या १ लाख १० हजार रूपये किमतीच्या २ हजार २०० निपा, तसेच मोहफुलाची २६ हजार ५०० रूपयांची २६५ लिटर दारू असा २ लाख २७ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. प्रेमिला छत्रपती उपरीकर हिला अटक करण्यात आली असून छत्रपती उपरीकर फरार असल्याची माहिती पथकाच्या प्रमुखांनी दिली आहे. या दोघांच्याही विरूध्द आरमोरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर १६ मे रोजी सोमवारी कुनघाडा ते इरई गाव या दरम्यान पोलिसांनी विश्वजीत ऊर्फ राजू दास (३०) रा. धानोरा, सपन सतीश मंडल (४०), नीलेश मारोती टिकले (२८) रा. दोघेही कुनघाडा, दिलीप विकास बाला रा. धानोरा यांच्याकडून विदेशी दारूच्या १ लाख ८ हजार रूपये किमतीच्या ४३२ निपा, गोल्डन गोवा विस्कीच्या १ लाख ३४ हजार ६०० रूपये किमतीच्या १ हजार ३४६ निपा, दारू विक्रीतून रोख आलेले ५ हजार ४०० व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले ५ लाख रूपये किमतीचे सीजी १९/बीडी ६६१० क्रमांकाचे चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या सर्व आरोपींविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)