९ लाखांची अतिरिक्त मजुरी प्रलंबित
By admin | Published: July 13, 2016 02:08 AM2016-07-13T02:08:50+5:302016-07-13T02:08:50+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात
रोजगार हमी योजना : विलंब झाल्यास व्याजासह मिळते मजुरी
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ७ लाख ७८ हजार ५३५ रूपये अतिरिक्त व्याजासह मजुरी म्हणून मजुरांना अदा केले आहेत. अद्यापही प्रशासनाकडे ९ लाख १८ हजार ७०० रूपयांची व्याजासह अतिरिक्त मजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे रोहयो मजूर ऐन खरीप हंगामात अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तत्काळ प्रलंबित मजुरी अदा करावी, अशी मागणी आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेसह विविध यंत्रणांच्या वतीने अनेक कामे केली जातात. ग्रामपंचायतस्तरावर रोहयोच्या माध्यमातून ५० टक्के कामे केली जातात. नोंदणीकृत प्रत्येक मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी राज्य शासनाने रोहयोच्या कायद्यान्वये दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून रोजगार देण्यासाठी प्रयत्नही केले जातात. मात्र मजुरी थकीत असण्याचे प्रमाण अधिक आहे. थकीत मजुरीमुळे मजूर अडचणीत येऊ नये तसेच अशा मजुरांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी नवा शासन निर्णय काढून थकीत मजुरीवर व्याज लावून अतिरिक्त मजुरी अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे.
प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात दरवर्षी रोहयो कामाची मजुरी देण्यास विलंब झालेल्या मजुरांना व्याजासह अतिरिक्त मजुरी दिली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ही आहेत मजुरी विलंबाची कारणे
रोजगार हमी योजनेच्या कामावरील नोंदणीकृत मजुरांना आपला आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंकिंग करणे अत्यावश्यक आहे. तसेच संबंधित मजुरांनी नरेगा प्रशासनाकडे आपला अचूक बँक खाते क्रमांक देणे गरजेचे आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक मजूर अद्यापही अशिक्षित आहेत. अनेक मजुरांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंकिंग केलेले नाही. शिवाय अनेक मजुरांनी चुकीचे बँक खाते क्रमांक नरेगाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिले आहेत. यासह विविध तांत्रिक कारणामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरीची रक्कम अनेक महिने थकीत असते. मजुरांच्या बँक खाते क्रमांकात अनेक त्रूट्या असल्याची माहिती नरेगा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. रोजगार सेवकाकडून हजेरी पत्रक उशिरा भरल्या जात असल्याने मजुरांची मजुरी प्रलंबित राहते.