जिल्ह्यातील ९० रेती घाटांचा होणार लिलाव
By admin | Published: November 2, 2014 10:34 PM2014-11-02T22:34:07+5:302014-11-02T22:34:07+5:30
जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण
दिलीप दहेलकर - गडचिरोली
जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ३ घाट अयोग्य दाखविण्यात आल्याने ते रद्द झाले आहेत. जिल्ह्यातील ९० रेती घाटांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे ३१ आॅक्टोबर रोजी पाठविले आहेत. त्यामुळे आता ९० रेती घाटांचा लिलाव होणार आहे.
पर्यावरणाच्या मंजुरीकरीता सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांसह ग्रामसभेचे ठराव व रेती घाटांचा गाव नकाशा आवश्यक असतो. त्यामुळे तहसीलदारांकडून रेती घाट लिलाव घेण्यास हरकत नसल्याचे ठराव व गाव नकाशा प्राप्त होताच पर्यावरण विभागाची मंजुरी प्राप्त करण्यासाठी फार्म १ मध्ये तयार करून प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने अंतिम मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे सदर ९० रेती घाटांचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर ई-निविदा प्रक्रिया राबवून रेती घाटांचा लिलाव करण्यात येणार आहे. साधारणत: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अथवा जानेवारी महिन्यात या रेती घाटांचा लिलाव होऊन रेती घाट सुरू होणार असल्याची शक्यता आहे.
आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील योग्य घाटांमध्ये अहेरी तालुक्यातील महागाव बुज, वांगेपल्ली, चिंचगुंडी, एटापल्ली तालुक्यातील आलदंडी, सेवारी, भामरागड, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, गोविंदपूर, गोमणी, विश्वनाथ नगर १, विश्वनाथ नगर २, चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम, गणपूर रै, इल्लूर, तळोधी मो., दोटकुली, मोहुर्ली मो., एकोडी, कुरूड, जोगना, घारगाव, पारडीदवे, मुरमुरी, धानोरा तालुक्यातील चिचोली, कारवाफा, बांदोना, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, आमगाव आदीसह ८ रेती घाटांचा समावेश आहे.