९० टक्के नवख्या उमेदवारांची प्रथमच ग्रामपंचायतमध्ये एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:35+5:302021-01-23T04:37:35+5:30

आरमोरी : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून बऱ्याच ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादीप्रणीत महाविकास आघाडीच्या गटाने कब्जा केल्याचा तर ...

90% entry of new candidates in Gram Panchayat for the first time | ९० टक्के नवख्या उमेदवारांची प्रथमच ग्रामपंचायतमध्ये एन्ट्री

९० टक्के नवख्या उमेदवारांची प्रथमच ग्रामपंचायतमध्ये एन्ट्री

Next

आरमोरी : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून बऱ्याच ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादीप्रणीत महाविकास आघाडीच्या गटाने कब्जा केल्याचा तर भाजपप्रणित सावकार गटाच्याही पॅनलने अनेक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व सिध्द केल्याचा दावा केला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी माजी पदाधिकारी उमेदवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. बहुसंख्य नवख्या उमेदवारांची प्रथमच ग्रामपंचायतमध्ये एन्ट्री झाली आहे.

तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय भवनात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी मतमाेजणी करण्यात आली. एकूण २१४ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा , कुलकुली, पिसेवडधा,सिर्सी, डोंगरगाव, डोंगरसावंगी, चामोर्शी माल, देऊळगाव, किटाळी, शिवणी, कासवी, देलनवाडी, चुरमुरा, कोरेगाव, देलोडा, बोरीचक, शंकरनगर आदी ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीने दावा केला आहे तर ठाणेगाव, इंजेवारी, वैरागड, सायगाव, वघाळा, पळसगाव, वडधा, मानापूर देलोडा, डोंगरसावंगी, चुरमुरा, शंकरनगर, वासाळा, पिसेवडधा, भाकरोंडी ग्रामपंचायतवर सावकार गटा(भाजपा)ने दावा केला आहे.

जोगीसाखरा येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर व दिलीप घोडाम याच्या पॅनलने ९ ही जागा काबिज करून एकहाती सत्ता घेतली. भाजपा तालुकाध्यक्षाच्या डोंगरगावात, पंचायत समिती सभापतीच्या शिवणीमध्ये तर विद्यमान जि.प. सदस्य असलेल्या वघाळा व देऊळगाव या गावात त्यांना मोठा धक्का बसला. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना गावकऱ्यांनी नाकारले. त्यामध्ये शंकरनगरचे माजी उपसरपंच सुजित मिस्त्री, सुबोध सरदार, वैरागडचे माजी उपसरपंच श्रीराम अहिरकर, चुरमुराचे माजी सरपंच मुखरू देशमुख, किटाळीचे माजी सरपंच रेवनाथ बोरकुटे, वासाळाचे माजी सरपंच प्रकाश जाैंजाळकर, डोंगरगावच्या माजी सरपंच रंजना नारदेलवार, देलोडाच्या माजी सरपंच राधिका होळी, बोरीच्या माजी सरपंच यामिना सेलोटे, कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण रहाटे,जोगीसाखराचे माजी उपसरपंच चंदू गरफडे, सिर्सीचे माजी उपसरपंच विश्वेश्वर दर्राे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य इंदिरा मोहुर्ले, बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी ग्रा. प. सदस्य वामन राऊत, भाजपा विधानसभा मीडिया सेलचे ओमकार मडावी तसेच भोलू सोमनानी यांचा समावेश आहे.

वैरागड येथील सोमनानी परिवारातील माजी सरपंच गौरी सोमनानी व शीतल सोमनानी विजयी झाल्या. महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष तथा कुलकुलीच्या माजी सरपंच मंगला कोवे, किटाळीचे माजी उपसरपंच राजेश लिंगायत, कोरेगावचे माजी सरपंच बालाजी गेडाम यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व देऊळगावचे उपसरपंच कवळू सहारे यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तेही तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवाराची संख्या अधिक असल्याने गावच्या कारभारणी खऱ्या अर्थाने महिला ठरणार आहेत. त्यामुळे यावेळी महिला सदस्यांभोवती गावाचे राजकारण फिरणार आहे.

आरमोरी तालुक्यात २९ ग्रा.पं. पैकी कुरंडीमाल व मोहझरी या दोन ग्रामपंचायतसह ४७ सदस्य हे मतदानापूर्वीच अविरोध झाले आहेत. त्यामुळे २७ ग्रामपंचायतीतील २१४ जागेसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी काम पाहिले.

Web Title: 90% entry of new candidates in Gram Panchayat for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.