908 अग्निरक्षक राेखणार वणवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:00 AM2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:31+5:30
आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जंगलात लागणाऱ्या आगींमुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. त्यामुळे आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागामार्फत विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी वणव्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आगी लागण्यास सुरुवात हाेते. मात्र, महिनाभरापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे आगी लागण्यास उशिर हाेत आहे. मात्र, माेह व तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर जंगलाला आगी लागण्यास सुरुवात हाेणार आहे. आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे.
मागील वर्षी ६,८३४ हेक्टर आगीच्या विळख्यात
मागील वर्षी जंगलात आग लागण्याच्या २ हजार ४४१ घटनांची नाेंद झाली. या घटनांमध्ये ६ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर आग पसरली. आगीमुळे जंगल व जैवविविधतेचे माेठे नुकसान झाले.
१३ हजार किमी फायरलाईन जाळणार
वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायरलाईनचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वनविभाग जास्तीत जास्त फायरलाईन जाळण्याचा प्रयत्न करते. यावर्षी वनविभागाने केलेल्या नियाेजनानुसार १२ हजार ७२५ किलोमीटर एवढी फायरलाईन जाळली जाणार आहे.
जंगलातून जाणारे रस्ते, पायवाटांवरचे गवत वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जाळले जाते. या ठिकाणचे गवत अगाेदरच जळले असल्याने उन्हाळ्यात आग लागली तरी ती आग पुढे पसरत नाही. काही जागा समांतर रेषेत जाळली जाते. त्याला फायरलाईन (जाळरेषा) असे म्हटले जाते.
ग्रामसभांना ताकीद
- तेंदूपत्त्यासाठी कंत्राटदाराने आग लावण्यास ग्रामसभांनी प्रतिबंध घालावा, अन्यथा संबंधित ग्रामसभा तसेच कंत्राटदार यांच्या विरूध्द कारवाई केली जाणार आहे. तसेच आग लागू नये, यासाठी संबंधित ग्रामसभेने अग्निरक्षक नेमावे, असे निर्देश ग्रामसभेला देण्यात आले आहेत.
काय आहे फायर अलर्ट?
वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायर अलर्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आकाशात असलेले सॅटेलाईट आगीच्या घटनेची नाेंद घेते व तसा संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविते. हा संदेश लगेच वनरक्षकाला प्राप्त होतो. वनरक्षक व त्याची यंत्रणा त्या ठिकाणी पाेहाेचून आग आटोक्यात आणणतात. त्यामुळे आगीचा विस्तार थांबण्यास माेठी मदत हाेते.