वैरागडच्या गणेश उत्सवाला ९२ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:38+5:302021-09-13T04:35:38+5:30

दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.गो.ना. मुनघाटे यांचे वडील नारायण मुनघाटे हे वैरागडला सन १९२७ मध्ये तलाठी म्हणून रुजू झाले. ...

92 year tradition of Ganesh Utsav of Vairagad | वैरागडच्या गणेश उत्सवाला ९२ वर्षांची परंपरा

वैरागडच्या गणेश उत्सवाला ९२ वर्षांची परंपरा

Next

दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.गो.ना. मुनघाटे यांचे वडील नारायण मुनघाटे हे वैरागडला सन १९२७ मध्ये तलाठी म्हणून रुजू झाले. देशप्रेमाने भारावलेल्या या युवकाने वैरागडचे त्यांचे समवयस्क युवक स्व.मारोतराव बोडणे, धर्मा आयटलवार, केशव लांजेवार, गणपती बोडणे, संभा भोयर, भैय्याजी पोफळी, टिकाराम अहिरकर, संभाजी कोंडेकर व इतरांच्या सहकार्याने वैरागड येथील गाटे मोहल्ल्यातील कौलारू गणेश मंदिरात सन १९२९ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. तत्कालीन काळात आजचा गडचिरोली जिल्ह्याचा समावेश चंद्रपूर जिल्ह्यात होता. तेव्हा चंद्रपूर शहरात दोन सार्वजनिक गणेश उत्सवाची आणि वैरागडचा एक असे चंद्रपूर जिल्ह्यात तीन सार्वजनिक गणेश उत्सव होते. त्यामुळे आजच्या गडचिरोली जिल्ह्याचा विचार केल्यास वैरागडच्या गाटे मोहल्ल्यातील गणेशोत्सव गडचिरोली जिल्ह्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव ठरतो.

गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या घरगुती गणेशोत्सवाची स्थापना गडचिरोलीत सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरी झाली. त्यानंतर, घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव व्यापक स्वरूपात साजरा होऊ लागला. वैरागडच्या देवळातल्या गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे उत्साह कमी झाला असला, तरी या सार्वजनिक उत्सवाची परंपरा नरेंद्र मानकर, राजू बावणे, बालाजी पोपळी, पितांबर लांजेवार, शिवा बरवे, कैलास मेहरे, भैया पंडेलगोत, नेताजी नेवारे, शुभम हटकर, धर्मा उपरीकर, अनिल लायटलवार, मोहन खोब्रागडे, धामराज कावडे, सुरेश कोंडेकर, संजय ढेगरे, घनशाम लांजेवार, सुधाकर भोयर व त्यांचे सहकारी यांनी कायम ठेवली आहे.

बॉक्स:

ऋणानुबंध कायम

या गणेश उत्सवाची स्थापना दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक गो.ना. मुनघाटे यांचे वडील नारायण मुनघाटे यांनी केली असल्याने आपल्या हयातीत गो.ना. मुनघाटे नित्यनेमाने या गणपतीच्या दर्शनाला यायचे. गो.ना. मुनघाटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व साहित्यिक प्रा.डॉ.प्रमाेद मुनघाटे हे आपल्या कुटुंबीयांसह या गणेश उत्सवाच्या ठिकाणी दरवर्षी भेट देऊन पूजाअर्चा करतात. या माध्यमातून मुनघाटे कुटुंबाने आजही ऋणानुबंध कायम ठेवले आहेत.

120921\img_20210911_135859.jpg

फोटो.. वैरागड येथील देवळातला गणपती

Web Title: 92 year tradition of Ganesh Utsav of Vairagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.