९४ टक्के रेशन कार्डांना ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:08 PM2017-10-30T23:08:20+5:302017-10-30T23:08:35+5:30
रेशन कार्डधारक स्वस्त धान्याच्या वाटपात होणारी अफरातफर बंद करून योग्य उत्पन्न गटातील व्यक्तीला त्याचे हक्काचे रेशन मिळण्यासाठी सर्व कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रेशन कार्डधारक स्वस्त धान्याच्या वाटपात होणारी अफरातफर बंद करून योग्य उत्पन्न गटातील व्यक्तीला त्याचे हक्काचे रेशन मिळण्यासाठी सर्व कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे. जिल्ह्यात हे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही १० हजार ८९८ कार्डधारकांनी आधार लिंक केलेले नाही. त्यांनी याबाबत उदासीनता दाखविल्यास भविष्यात त्यांचे रेशन कार्ड स्वस्त धान्य मिळण्यासाठी अपात्र ठरणार आहे.
महागाईच्या या जमान्यात रेशन दुकानातून सरकारी अनुदानावर मिळणारे स्वस्त धान्य, साखर, तेल, रॉकेल अशा दैनंदिन जीवनमानातील काही आवश्यक वस्तू गोरगरीब कुटुंबांना बºयाच प्रमाणात दिलासा देतात. मात्र बहुतांश लोक तहसील कार्यालयातील संबंधित यंत्रणेला हाताशी धरून रेशन कार्डवर कमी उत्पन्न दाखवत स्वस्त धान्याचा लाभ घेतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेकांच्या नावे रेशन कार्ड बनविण्यात आले आहेत. परंतू रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्यामुळे कोणत्या कुटुंबात किती सदस्य आहेत हे समजण्यासोबतच कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न व इतर बाबीही दिसून येतात. त्यामुळे या यंत्रणेतील भ्रष्ट कारभारावर नियंत्रण येण्यासाठी सरकारने प्रत्येक रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणी अत्यावश्यक केले.
जिल्ह्यात अंत्योदय रेशन कार्डधारक ९२ हजार ७९८ आहेत. त्यापैकी ८६ हजार ८२ जणांचे कार्ड आधारशी जोडल्या गेले. प्राधान्य कुटुंबातील ५१ हजार ९७६ पैकी ४९ हजार ८९३ हजार कार्ड आधारशी जोडले आहेत. तर ३८ हजार ४६ साध्या रेशन कार्डपैकी ३५ हजार ९४७ कार्ड आधारशी लिंक करण्यात आले आहेत. एकूण १ लाख ८२ हजार ८२० रेशन कार्डपैकी १ लाख ७१ हजार ९२२ कार्ड आधारशी जोडण्यात आलेत. रेशन कार्ड आधार लिंक करण्यात गडचिरोली तालुक्याने आघाडी घेतली आहे. २३ हजार २५२ पैकी केवळ ९६ कार्ड आधार लिंक करणे बाकी आहे. त्याखालोखाल देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा हे तालुकेही आघाडीवर आहेत.