पालिकेत ९५% कर्मचारी हजर
By admin | Published: May 8, 2016 01:11 AM2016-05-08T01:11:47+5:302016-05-08T01:11:47+5:30
गडचिरोली शहराच्या ५० हजार लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या गडचिरोली नगर पालिकेत अनेकदा कर्मचारी राहत नाही.
मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती : पाणी पुरवठा, वीज व जनगणना विभागातील मात्र कर्मचारी बेपत्ता
दिलीप दहेलकर गडचिरोली
गडचिरोली शहराच्या ५० हजार लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या गडचिरोली नगर पालिकेत अनेकदा कर्मचारी राहत नाही. त्यामुळे वयोवृध्द नागरिक, महिला आदींना काम न होताच परत जावे लागते. अशा तक्रारी लोकमतला मिळाल्या होत्या. त्या आधारे लोकमतने शनिवारी सकाळी ११.२० वाजता गडचिरोली नगर पालिकेत स्टिंग आॅपरेशन केले. जवळजवळ दुपारी १ वाजेपर्यंत लोकमत प्रतिनिधी नगर पालिका परिसरात सर्व विभागांना भेट देऊन कर्मचारी हजर आहे किंवा नाही. नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवून घेण्यात काही अडचणी येत आहेत काय हे जाणून घेत होता. शनिवारी पाणी पुरवठा , वीज व जनगणना विभाग वगळता पालिकेच्या उर्वरित विभागातील ९५ टक्के कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर असल्याचे आढळून आले. उल्लेखनीय बाब म्हणजे बदली झालेले मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे हे ही सकाळपासूनच कार्यालयात हजर होते, असेही दिसून आले.
तक्रार निवारण कक्षात टी. टी. रामटेके नामक तर आवक-जावकचे काम करणारे अशोक तलांडे हे कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. त्यानंतर राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर विभाग व्यवस्थापन कक्षाला भेट देण्यात आली. येथील तिन्ही कर्मचारी मुख्याधिकारी बन्नोरे यांच्या कक्षात गेले असल्याने सुरूवातीला येथील टेबल व खुर्च्या रिकाम्या होत्या. १५ मिनिटानंतर येथील तिन्ही कर्मचारी परत कामावर दाखल झाले.
विद्युत विभागाला भेट दिली असता येथील सहायक अभियंता सुनिल गोसे हे गैरहजर आढळून आले. मात्र मजूर म्हणून कार्यरत यु. पी. तिजारे हे हजर राहून कामकाज सांभाळत होते.
लेखा विभागातील सर्वच पाच कर्मचारी उपस्थित असल्याचे यावेळी आढळून आले. त्यानंतर ११.४० वाजता शिक्षण विभागाला भेट दिली असता, येथील लिपीक डी. ए. मेश्राम व शिपाई डी. डी. नैताम हजर होते. मेश्राम हे संगणकावर बसून आॅनलाईन कामकाज करीत असल्याचे दिसून आले.
याच विभागात जनगणनेचे काम करणारे कर्मचारी बी. एल. ताकसांडे मात्र यावेळी गैरहजर असल्याचे दिसून आले.
आरोग्य विभागात आरोग्य निरिक्षक डी. डी. संतोषवार, प्रणाली दुधबळेसह तीन कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले.