सात महिन्यात ९९ नवजात बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:13 PM2018-12-08T22:13:22+5:302018-12-08T22:14:18+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला. मातेच्या सुदृढपणाचा अभाव आणि गर्भावस्थेतील बालकाच्या कुपोषणासोबतच काही प्रसंगात योग्य उपचारांचा अभाव ही या बालमृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत.
जिल्ह्यातील देसाईगंज वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवेअंतर्गत विविध सुविधा पुरविल्या जातात. याअंतर्गत ग्रामीण भागात गेल्या ७ महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आरोग्य विभागाने विविध शिबिरे आणि गरोदर मातांच्या तपासणी व उपचारावर ३३ लाख ५२ हजार रुपये खर्च केल्याचे दिसून येते. मात्र यादरम्यान ४६ बालकांचा उपजतच तर ५३ बालकांचा अर्भकावस्थेत असताना मृत्यू झाला. याशिवाय ७ गरोदर मातांना जीव गमवावा लागला. गर्भावस्थेत आवश्यक असलेल्या पोषक घटकांअभावी महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण बरेच आहे. परिणामी वेळेवर योग्य तो पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे गर्भातील बाळाला मातेच्या आहारातून मिळणाऱ्या पोषक घटकांपासून वंचित राहावे लागून त्याची योग्य प्रकारे वाढ होत नाही. गर्भातच त्याचे असे कुपोषण होत असल्याने तो सुदृढ होत नाही. पोटातील बाळ किती सुदृढ आहे याची वेळोवेळी तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे असते. पण दुर्गम भागात या तपासण्या होत नाही. त्यामुळे बाळाचा उपजत अवस्थेतच मृत्यू होतो. गेल्या सात महिन्यात यामुळेच ४६ बालक दगावले आहेत.
१८६ शिबिरातून तपासणी व उपचार
गर्भवती महिलांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालक तथा त्यांच्या मातांची तपासणी करण्यासाठी एप्रिल ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ४४० शिबिरांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १८६ शिबिरे घेण्यात आली. कुरखेडा आणि गडचिरोली तालुका वगळता इतर सर्व तालुके ही शिबिरे घेण्यात मागे पडले. सिरोंचा तालुक्यात तर सात महिन्यात एकही शिबिर झाले नाही. एटापल्ली तालुक्यात अवघे २ तर कोरची तालुक्यात ४ शिबिरे झाली. संबंधित तालुका आरोग्य अधिकाºयांचा ढिसाळपणा हेसुद्धा बाल व मातामृत्यू मागील एक कारण ठरत आहे.
एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणात एटापल्ली तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येते. या तालुक्यात गेल्या सात महिन्यात १२ बालकांचा उपजत मृत्यू तर १८ बालकांचा अर्भकावस्थेत मृत्यू झाला आहे. याशिवाय २ मातांचाही मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यात ६ उपजत तर ७ अर्भक मृत्यू झाले आहेत. तसेच एका मातेलाही जीव गमवावा लागला. या तालुक्यात आरोग्य सेवेत सुधारणा करण्यास वाव निर्माण झाला आहे.