लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षांच्या मुलीला चिरडले
By संजय तिपाले | Published: May 14, 2023 06:12 PM2023-05-14T18:12:31+5:302023-05-14T18:12:51+5:30
१५ दिवसांत तीन बळी: सुरजागड प्रकल्पाच्या बेसुमार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
गडचिरोली: लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने मुरखळा येथे दोघांचा बळी घेतल्याची घटना ३० एप्रिलला घडली होती. यानंतर १४ मे रोजी चामोर्शी तालुक्यात लोहखनिजाच्या ट्रकने १२ वर्षीय मुलीचा बळी घेतला. १५ दिवसांत तीन बळी गेल्याने सुरजागड प्रकल्पातील लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोनाक्षी मसराम (वय १२,रा. नांदगाव ता. राजुरा जि.चंद्रपूर) असे मृत मुलीचे नाव आहे. १४ रोजी सोनाक्षी ही आपल्या मामासोबत दुचाकीवरूनने आष्टी येथून गोंडपिपरीकडे जात होती. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने खडी, मुरुम अंथरलेला आहे. त्यावरून दुचाकी घसरली. यावेळी दोघेही खाली पडले. याचदरम्यान पाठीमागून आलेल्या लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला चिरडले.
ट्रकसह चालक पळाला
अपघातानंतर चालक ट्रकसहवाह पळून गेला. सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक बेदरकारपणे धावतात. त्यामुळे रस्ते तर खराब होतच आहेत, पण हे ट्रक सामान्यांचा बळी घेऊ लागले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.