रुग्णवाहिका न मिळाल्याने बसमधून दवाखान्यात, पण प्रयत्न असफल, ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By संजय तिपाले | Published: June 27, 2024 03:34 PM2024-06-27T15:34:47+5:302024-06-27T15:40:59+5:30

आरोग्यसेवेचे धिंडवडे: अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिलीची घटना

A 4-year-old boy died in hospital due to lack of ambulance, but failed | रुग्णवाहिका न मिळाल्याने बसमधून दवाखान्यात, पण प्रयत्न असफल, ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

A 4-year-old boy died in hospital due to lack of ambulance, but failed

गडचिरोली : अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना २४ जूनला अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिली येथे घडली. तीन दिवसांनंतर समोर आलेल्या या घटनेने आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहेत.

 

आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे.  २३ जून रोजी मध्यरात्री त्याची प्रकृती खालावली होती. त्याला पोटदुखीचा त्रास होता. कोरेलीपासून पाच किमी दूर असलेल्या पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. २४ जूनला पहाटे त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अहेरी येथे नेण्यास सांगितले. परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले. दरम्यान, वाटेत त्याची प्रकृती अधिक खालावली. ही बाब बस चालक गौरव आमले यांना लक्षात येताच त्यांनी बस थेट आलापल्ली येथील आरोग्य केंद्रात नेली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. यावेळी आर्यनसोबत त्याचे आजी व आजोबा होते. तर वडील दुचाकीने यायला निघाले होते. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांना संपर्क केला, पण कार्यक्रमात असल्याचे सांगून त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

 

रुग्णवाहिका नसताना रेफर केले कसे ?
आर्यनवर २३ जूनच्या रात्रीपासून उपाचार सुरु करण्यात आले होते. शेवटच्या क्षणी प्रकृती अधिक खालावल्याने त्याला अहेरीला ‘रेफर’ करण्यात आले. उशीर न करता आधीच त्याला अहेरीला पाठविले असते आणि रुग्णावाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर आर्यनचा जीव वाचला असता असा पालकांचा दावा आहे.  दरम्यान, रुग्णवाहिका नसताना चिमुकल्याला शेवटच्या क्षणी रेफर केले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

कधी संपणार हा वनवास ?
जिल्ह्यात उपचाराअभावी दोन मातांचा मृत्यू झाल्याची घटना अहेरी येथे तीन महिन्यांपूर्वी घडली होती. समिती नेमून चौकशी केली, पण कारवाई काहीच झाली नाही. यापूर्वी देखील दुर्गम, अतिदुर्गम आदिवासीबहुल भागात रुग्णांना  कधी झोळीतून तर कधी नाला पार करण्यासाठी डोंग्यातून प्रवास करत दवाखाना गाठावा लागल्याचे चित्र आहे. काही अधिकारी मुख्यालयी थांबत नाहीत, आदिवासींना पायाभूत आरोग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते, त्यामुळे हा वनवास संपणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

Web Title: A 4-year-old boy died in hospital due to lack of ambulance, but failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.