एका क्षणात भंगले स्वप्न, मामासाठी मदतीची याचना करणारी भाचीही ठार
By दिगांबर जवादे | Published: June 27, 2023 03:56 PM2023-06-27T15:56:36+5:302023-06-27T15:58:26+5:30
पदवी प्रवेशासाठी जाताना काळाचा घाला : एटापल्ली तालुक्यातील वेलमागडची घटना
गडचिराेली : एटापल्ली येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेण्यासाठी दुचाकीने येत असताना दुचाकीची झाडाला धडक बसल्याने मामा व चुलत भाची गंभीर जखमी झाली. मामाला रुग्णालयात नेण्यासाठी भाची मार्गाने ये-जा करणाऱ्यांना विनवणी करीत हाेती. मात्र, मामा जागेवरच ठार झाला होता. तर भाचीसुद्धा उपचारादरम्यान मरण पावली. ही हृदयद्रावक घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावाजवळ घडली.
नथ्थू पुस्सु हिचामी (२५, रा. जीवनगट्टा) असे मामाचे तर रोशनी बंडु पदा (२२, रा. पिपली (बुर्गी)) असे भाचीचे नाव आहे. नथ्थू हिचामी हा कामानिमित्त बहिणीच्या घरी पिपली (बुर्गी) गावात गेला होता. ताे आपल्या गावी जिवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला. नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हाेता. त्यामुळे ती एटापल्लीपर्यंत येण्यासाठी नथ्थूच्या दुचाकीवर बसली.
पिपली (बुर्गी)वरून निघाल्यानंतर गावाजवळून चार किमी अंतरावर वेलमागड गावाजवळ दुचाकीची झाडाला धडक दिली. या अपघातात नथ्थूचा जागीच मृत्यू झाला. रोशनी गंभीर जखमी झाली. तिला पिपली (बुर्गी) गावात नेल्यानंतर तिचाही काही वेळाने मृत्यू झाला. नथ्थूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेतीची कामे करायचा. रोशनी बारावी उत्तीर्ण झाली हाेती. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, हे स्वप्न अपूर्णच राहिले.