रस्त्यावर केक मांडला, तलवारीने कापला, ऐनवेळी धडकले पोलिस अन्...
By संजय तिपाले | Published: November 26, 2023 07:19 PM2023-11-26T19:19:02+5:302023-11-26T19:19:22+5:30
ही कारवाई २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आरमोरी येथे करण्यात आली.
गडचिरोली : वाढदिवसाचे सेलिब्रेशन थेट रस्त्यावर, केक कापण्यासाठी चक्क तलवार, पण इतक्यात पोलिस धडकले अन् बर्थ डे बॉयसह सेलिब्रेशन करण्यासाठी गोळा झालेल्यांना उचलले. तिघांना अटक केली असून एक फरार आहे. ही कारवाई २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आरमोरी येथे करण्यात आली.
आरमोरी शहरातील रामाळा जाणाऱ्या मार्गावर २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पोलिस गस्त घालत होते. बारा वाजेनंतर काही तरुण रस्त्यात आरडाओरड करताना आढळले. त्यामुळे पोलिसांनी तेथे धाव घेेतली असता रस्त्यावर केक मांडून तो तलवारीने कापत असल्याचे आढळले. विशेष म्हणजे याचा व्हिडीओही त्याच्या सोबत असलेले काढत होते. पोलिसांनी लोकेश विनोद बोटकावार (वय २१) , लोकमित्र खुशाल ठाकरे (वय २५), बादल राजेंद्र भोयर (वय २३), पवन मनोहर ठाकरे (वय २५) यांना ताब्यात घेतले तर राहुल मनोहर नागापुरे (२८) हा फरार झाला. हे चौघेही आरमोरीच्या बाजारटोली परिसरातील रहिवासी आहेत.
त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. तलवारीसह दोन दुचाकी (एमएच ३३ एए-१३४०), (एमएच ३३ वाय- ७८५४) असा सुमारे ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.नि. संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपनिरीक्षक संतोष कडाळे हे करीत आहेत.