दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही
By दिलीप दहेलकर | Published: July 25, 2023 05:38 AM2023-07-25T05:38:41+5:302023-07-25T05:39:01+5:30
गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचे धिंडवडे
दिलीप दहेलकर, लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड (जि. गडचिरोली) : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा मृतदेह चक्क दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आला. या घटनेमुळे गडचिराेलीच्या दुर्गम भागातील आराेग्यसेवेचे धिंडवडे निघाले.
देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे दुर्गम भागात साधी रुग्णवाहिकाही मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून आतातरी आरोग्य सुविधा मिळतील का, असा सवाल लोक उपस्थित करीत आहेत.
कृष्णार येथील गणेश लामी याला १७ जुलैला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. २० जुलैला त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचा मृतदेह गावी आणण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे चक्क खाट दुचाकीला बांधून त्यावर मृतदेह बांधून घेऊन येण्याची वेळ आली.