हत्तीच्या कळपाने ५० एकर धान तुडवले पायाखाली, शेतीसाहित्याचीही केली नासधूस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:12 AM2023-09-08T11:12:54+5:302023-09-08T11:13:46+5:30

उपद्रव थांबेना : शेतकरी हवालदिल

A herd of elephants trampled 50 acres of paddy | हत्तीच्या कळपाने ५० एकर धान तुडवले पायाखाली, शेतीसाहित्याचीही केली नासधूस

हत्तीच्या कळपाने ५० एकर धान तुडवले पायाखाली, शेतीसाहित्याचीही केली नासधूस

googlenewsNext

कुरखेडा (गडचिरोली) : तालुक्यात रानटी हत्तीच्या कळपाचा धुडगूस काही केल्या थांबायला तयार नाही. गुरनोलीजवळील शेतशिवारात १५ ते २० हत्तींच्या कळपाने ६ सप्टेंबरला रात्री तब्बल ५० एकरावर धान पायादळी तुडविले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रानटी हत्तीचा कळप मुक्कामी आहे. चारभट्टीमार्गे आगमन केल्यावर खेडेगाव, डोंगरगाव, दादापूर, आंबेझरी, आंधळी सोनपूर, दल्ली, अंगारा, सोनसरी, चांदागड, चिनेगाव, पळसगाव परिसरात या कळपाने धुडगूस घातला. त्यानंतर रात्री कळपाने आपला मोर्चा गुरनोली शिवाराकडे वळवला. यावेळी जवळपास ५० एकर धान शेती पायदळी तुडवले. हत्तींनी विद्युतपंप, पाईप, विद्युत पेटी, संरक्षक जाळी तसेच लाकडी बांबू आडवे करुन मोठे नुकसान केले. जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या धानपिकासह साहित्याचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकसानीची केली पाहणी

दरम्यान, गुरनोलीच्या सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे, ग्रामपंचायत सदस्य सूरज सयाम तसेच नसीर हाशमी गेवर्धा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजू बारई यांनी पाहणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

आधी पावसाने, आता हत्तींनी छळले

गुरनोली परिसरात धानपिकाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. या भागात पिके जोमात होती, परंतु पावसाने उघडीप दिल्याने पिके संकटात सापडली होती. पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, याचवेळी रानटी हत्तींच्या कळपाने धानपीक तुडवून नुकसानीत भर टाकली. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

गुरनोली शिवारात रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ या कळपाचा बंदोबस्त करावा व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये भरपाई द्यावी.

- सुप्रिया तुलावी, सरपंच गुरनोली

गुरनोली शिवारातील नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने वनकर्मचाऱ्यांना पाठवून पाहणी केली. पंचनामे देखील करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. नुकसानीचा सविस्तर अहवाल उपविभागीय कार्यालयाकडे सादर केला जाईल. योग्य ती भरपाई देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- मनीषा कुंबलवार, वन परिक्षेत्राधिकारी, कुरखेडा

Web Title: A herd of elephants trampled 50 acres of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.