प्रेमच बनले वैरी..; सुडापोटी सुनेकडून विषप्रयोग, कुटुंबातील पाच जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:52 AM2023-10-19T10:52:20+5:302023-10-19T10:53:16+5:30

ताटात दाळ अन् पोटात काळ; दोन महिन्यांपूर्वी रचला कट

A highly educated daughter-in-law killed five members of the family by giving poison through food amid revenge | प्रेमच बनले वैरी..; सुडापोटी सुनेकडून विषप्रयोग, कुटुंबातील पाच जणांची हत्या

प्रेमच बनले वैरी..; सुडापोटी सुनेकडून विषप्रयोग, कुटुंबातील पाच जणांची हत्या

गडचिरोली/अहेरी : ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केले त्या पतीने केलेली मारहाण, सासरच्या मंडळींनी माहेरच्यांना दिलेले टोमणे जिव्हारी लागल्याने एका सुशिक्षित विवाहितेने संपत्तीच्या वादातून दुखावलेल्या पतीच्या मामीच्या साहाय्याने स्वत:च्याच कुटुंबात सुडाचा प्रवास सुरू केला. ताटात जेवण देणाऱ्या सुनेच्या पोटात काळ दडल्याची भणकही कुटुंबीयास नव्हती. अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील पाच जणांच्या हत्येच्या मन हेलावणाऱ्या घटनेतील दोन्ही आरोपींनी दोन महिन्यांपूर्वीच हा कट रचला होता. पहिला प्रयत्न फसल्यावर दुसऱ्या प्रयत्नात डाव साधला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शंकर तिरुजी कुंभारे (५२)यांच्यासह पत्नी विजया (४५), त्यांची मुलगी कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी, ता. अहेरी), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) व रोशनची मावशी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे (५०, रा. बेझगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर) यांचा मृतांत समावेश आहे. रोशन हा सिरोंचा येथे पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होता. याच कार्यालयात संघमित्रा (२५) ही नोकरीला होती. मूळची अकोला येथील संघमित्रा व रोशन एकाच जातीचे. ओळखीचे रूपांतर प्रेमात व प्रेमातून ते दोघे लग्नबंधनात अडकले. डिसेंबर २०२२ मध्ये पत्नी म्हणून रोशनच्या आयुष्यात आलेल्या संघमित्रासोबत काही महिने सुखाचा संसार सुुरू होता. मात्र, संघमित्राच्या प्राध्यापक वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांना पक्षाघात झाला व नंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. लग्नानंतर सातव्या महिन्यात कौटुंबिक वादातून रोशनने पत्नीला मारहाण केली होती.

सासरचे लोकही तिला टोमणे देत असल्याने ती अस्वस्थ होती. रोशनची मामी रोजा रामटेके (४२) महागावातच राहते. रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीत रोशची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी हिस्सा मागितला होता, त्यामुळे तिच्या मनातही राग भडकत होता.

  • संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा कट दोन महिन्यांपूर्वी अतिशय थंड डोक्याने आखला. संघमित्रा हिने विषारी द्रव अन्नपाण्यातून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक द्रव मागवले, पण त्याचा हिरवा रंग तयार झाला, शिवाय उग्र वासही येत होता, त्यामुळे त्यांनी खुनाचा कट पुढे ढकलला.
  • तिने इंटरनेटवर घातक विषारी द्रवाचा अभ्यास केला. मंद गतीने शरीरभर पसरणारे, दर्प न येणारे व रंगही नसलेले द्रव अखेर तिला सापडले. दीड महिन्यांपूर्वी परराज्यातून तिने हे द्रव मागवले व अन्नपाण्यातून देण्यास सुरुवात केली.
  • कधी डाळीतून तर नॉनव्हेज जेवणातून तर कधी पाण्यातून तिने विषारी द्रव दिले. यात पतीसह सासू-सासरे, नणंद व पतीची मावशी अशा पाच जणांचा बळी गेला.

'कोल्ड ब्लडेड मर्डर'! इंटरनेटवर सर्च करून ५ जणांचा काटा काढला, परराज्यातून विष मागवलं; अन्..

विषप्रयोगासाठी नणंदेला खास चिकनचा बेत

संघमित्रा हिने विषप्रयोगाचा सर्वात पहिला प्रयोग केला. नणंद काेमल दहागावकर हिचे पती बाहेरगावी असल्याची संधी साधून संघमित्रा हिने घरी चिकनचा बेत केला, त्यात विषारी द्रव मिसळले व डबा घेऊन कोमल दहागावकरच्या घरी गेली. चिकन खाल्ल्यानंतर कोमलची तब्येत खालावली. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होत असतानाच तिच्या आई-वडिलांचा विषप्रयोगाने मृत्यू झाला, त्यानंतर कोमलची प्रकृती पुन्हा बिघडली व त्यातून ती सावरलीच नाही, शेवटी मृत्यूने तिला गाठले.

विसंगती, इंटरनेट सर्चिंगने भंडाफोड

  • लागोपाठ पाच जणांच्या मृत्यूमुळे अहेरी व परिसरात खळबळ उडाली होती. अफवांचे पेव फुटले होते. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते.
  • संघमित्रा कुंभारे हिचे सासरच्यांशी पटत नव्हते तसेच मामी रोजा रामटेके हिला विजया कुंभारे व त्यांच्या तीन बहिणींनी सासऱ्याच्या नावे असलेल्या जमिनीत हिस्सा मागितलेली बाब आवडलेली नव्हती, ही बाब तपासात समोर आली. १७ ऑक्टोबरला दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • दोघींच्या चौकशीत विसंगती आढळून आली, शिवाय संघमित्राच्या इंटरनेट सर्चिंगमध्ये घातक विषारी द्रव सर्च केल्याचे आढळले. सुरुवातीला दोघींनीही आढेवेढे घेतले, पण पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघींनीही संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा केला.

 

दोघींना १० दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, दोन्ही आरोपींना १८ ऑक्टोबरला अहेरी न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पो. नि. मनोज काळबांडे यांनी दिली.

Web Title: A highly educated daughter-in-law killed five members of the family by giving poison through food amid revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.