सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती - विकास आमटे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:53 PM2023-01-28T12:53:01+5:302023-01-28T12:53:26+5:30

गाेंडवानाच्या अमृत कला क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

A legacy of service is the richness of our lives - Vikas Amte | सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती - विकास आमटे

सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती - विकास आमटे

Next

गडचिरोली : आनंदवनात आत्तापर्यंत कितीतरी कुष्ठरोग्यांवर उपचार आणि सेवा करण्यात आली आहे. समाजाने दुर्लक्षित केलेल्या या कुष्ठरोग्यांच्या सेवेपेक्षा त्यांना आत्मनिर्भर आणि सन्मानित जीवन देण्यासाठी बाबांनी कार्य केले. आजही अंध, अपंग, कुष्ठरोगी वेगवेगळ्या प्रकल्पाशी जुळलेले आहेत. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही, पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे, अशा भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केल्या.

२७ ते २९ जानेवारी अशा तीन दिवसीय गोंडवाना विद्यापीठ परिसरात अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे शुक्रवारला विद्यापीठ परिसरात उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर प्रमुख अतिथी म्हणून स्लम सॉकर (झुंड फेम) प्रा. विजय बारसे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, चंद्रपूर येथील नाट्यकलावंत संजय दत्तोजी रामटेके आदी उपस्थित हाेते. तसेच मंचावर विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान अधिष्ठाता डॉ. चंद्रमाऊली, नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, प्राचार्य डॉ. मृणाल काळे, संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विजय सिल्लारे, उपाध्यक्ष जितेंद्र अंबागडे, हेमंत बारसागडे, सतीश पडोळे, विजयकुमार घरत अधिसभा सदस्य, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव, आणि प्रशांत रंदई आदी उपस्थित होते.

यावेळी नाट्य कलावंत संजय रामटेके म्हणाले, अमृत म्हणजे संजीवनी. या अमृत महोत्सवाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलंय. काही नवं करण्याची संधी त्यांच्यामध्ये मध्ये निर्माण झाली आहे. कलाकार म्हणून एखादी भूमिका करताना त्या भूमिकेमध्ये पूर्णतः शिरावं लागतं. तेव्हाच आपण त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो. तशीच भूमिका आज तुम्हाला वठवायची आहे, असे ते म्हणाले.

स्पर्धेमध्ये कुणीतरी जिंकेल आणि कुणीतरी हरेल, एकोप्याने खेळा आणि उत्साहाने खेळा कारण खेळ हा आयुष्याचा उत्सव असतो, असे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता लोखंडे, संचालन उपकुलसचिव डॉ. संदेश सोनुले यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक उपस्थित होते.

अडीच लाख मुला-मुलींना दिले फुटबॉलचे प्रशिक्षण

काम करत असताना प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, जग आपोआप आपल्या मागे येईल. शरीर म्हातारे होत असलं तर मन नेहमी तरुण ठेवावे. २२ वर्षांपूर्वी मी स्लम सॉकर म्हणजेच झोपडपट्टी फुटबॉलची स्थापना केली. आतापर्यंत देशभरात जवळपास अडीच लाख झोपडपट्टीतील मुलामुलींना या मोहिमेतून फुटबॉलचे प्रशिक्षण मी दिले आहे, असे स्लम सॉकर (झुंड फेम) प्रा. विजय बारसे यांनी सांगितले.

Web Title: A legacy of service is the richness of our lives - Vikas Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.