मुडझाच्या झुडपी जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

By दिलीप दहेलकर | Published: October 30, 2022 06:10 PM2022-10-30T18:10:27+5:302022-10-30T18:10:45+5:30

गडचिराेली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६८ मध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला. 

A leopard was found dead in Gadchiroli forest area  | मुडझाच्या झुडपी जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

मुडझाच्या झुडपी जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

Next

गडचिरोली : गडचिराेली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६८ मधील मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी रविवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुडझा गावालगतच्या कक्ष क्रमांक १६८ मधील झुडपी जंगलात वनकर्मचारी गस्त करीत असतांना बिबट हा मृतावस्थेत आढळून आला. 

घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) अरविंद पेंदाम, क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, बोदलीचे वनरक्षक भसारकर, चांदाळाचे वनरक्षक गौरव हेमके व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर पाहणी केली असता, मृत बिबट हा अंदाजे दिड ते दोन वर्ष वयाचा असून त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही. सदर मृत बिबटयाचे शवविच्छेदन पाेटेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. बि.ए. रामटेके यांनी केले. प्राथमिक स्वरुपात मृत्यूचे कारण अजूनही कळले नसले तरी गोळा केलेल्या नमुन्याचा परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे.

सहाय्यक वनसंरक्षक एस. बी. भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अ.नि. पेंदाम यांनी प्राथमिक चौकशी केली असता, शरीराचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे दिसून आले. नख, मिशा, पंजे आदी व्यवस्थित आहेत. आजुबाजुला शिकारी बाबतचे कुठलेही ठोस पुरावे आढळले नाही. सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर तसेच मुडझा येथील पोलीस पाटील लाेचन महेंद्र मेश्राम, तुलाराम राऊत, गा. पं. सदस्य सुरेखा सुरपाम आदी  उपस्थित होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृत शरीरास अग्नी देऊन सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.

वनविभाकडून सावधानतेचा इशारा 
सदर प्रकरणावरुन आजुबाजुच्या परिसरात बिबट व त्यांचे बछडे असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी केले आहे. सदर घटनेची चौकशी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम करीत आहेत.


  

Web Title: A leopard was found dead in Gadchiroli forest area 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.