गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय
By ओमकार संकपाळ | Published: April 4, 2023 04:16 PM2023-04-04T16:16:14+5:302023-04-04T16:17:52+5:30
अवघ्या आठ दिवसांत पुस्तके, साहित्यांची जुळवाजुळव; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लाभ
रमेश मारगोनवार
भामरागड (गडचिरोली) : गाव करील ते राव करील काय... अशी एक म्हण आहे. याचा प्रत्यय अतिदुर्गम व नक्षल प्रभावित कोठी या गावात ३ एप्रिलला आला. उंच पहाड... डोंगरदऱ्या व घनदाट जंगलांनी वेढलेले हे गाव कायमच नक्षल्यांच्या प्रभावाखाली असते. पोलिसांनी लोकांच्या मदतीने येथे अवघ्या आठ दिवसांत वाचनालय उभारून ज्ञानाचे दरवाजे किलकिले केले आहेत. पंखा, खुर्ची, कपाट, आकर्षक रंगरंगोटी, महापुरुषांच्या प्रतिमा यामुळे अद्ययावत वाचनालय उभारले आहे.
आठशे लोकसंख्या व २९० उंबरठे असलेल्या कोठी येथे दहावीपर्यंत आश्रमशाळा आहे. शिवाय परिसरातील इतर गावांचा येथे संपर्क असतो. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, वाचनालय नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त ग्रंथसंपदा वाचण्यास मिळत नव्हती. या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या दादालोरा खिडकी योजनेंतर्गत लोकांच्या सहकार्यातून वाचनालये उभारली जात आहेत. कोठी येथे आठ दिवसांपूर्वी वाचनालय उभारण्याचे काम पोलिसांनी हात घेतले.
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत किरकोळ डागडुजी करून वाचनालय बनविण्यात आले. त्यात स्पर्धा परीक्षांपासून ते काव्यसंग्रह, ललित लिखाण, कथा, कादंबऱ्या अशी एकूण २०० पुस्तके आहेत. कोणी खुर्ची तर कोणी टेबल, कोणी वाचनालयाचा नामफलक तर कोणी रंगरंगोटीचा खर्च उचलला अन् पाहता पाहता आठ दिवसांतच वाचनालय उभे झाले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे (अभियान), अपर अधीक्षक कुमार चिंता (प्रशासन), अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या संकल्पनेतून व उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या वाचनालयाची निर्मिती झाली. प्रभारी अधिकारी संजय झराड, उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांनी वाचनालयासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करून आभार मानले...
ग्रंथदिडीने वेधले लक्ष
वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी आरपीएफचे असिस्टंट कमांडंट भरत राणा उपस्थित होते. पोलिसपाटील कन्ना हेडो यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. तत्पूर्वी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी - अंमलदार व गावकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
६० ठिकाणी उभारणार वाचनालये
दुर्गम भागातील आदिवासींच्या मुलांना शिक्षणासोबत बौद्धिक ज्ञान मिळावे, त्यांच्यावर संस्कार व्हावेत, प्रेरणादायी कथांतून त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पोलिस दलाने लोकवर्गणीतून ‘एक गाव, एक वाचनालय’ हा उपक्रम १८ जानेवारी २०२३ रोजी सुरू केला आहे. एकूण ६० ठिकाणी वाचनालये उभारण्याचे उद्दिष्ट पोलिस प्रशासनाने ठेवले असून, आतापर्यंत २२ ठिकाणी वाचनालये सुरू झाली आहेत.