जंगली हत्तींचा बोळधा शिवारात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 10:49 PM2022-09-23T22:49:51+5:302022-09-23T22:51:06+5:30
शंकरपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३ मध्ये हत्ती पोहोचले. कोरेगाव चोप, बोळधा, रावनवाडी टोली परिसरात काही प्रमाणात नागरिकांना या जंगली हत्तींचे कुतुहल होते. पण त्यांनी केलेले नुकसान पाहून दहशत पसरली. दरम्यान वनविभागाने नागरिकांनी सतर्क राहून हत्तींना कुठल्याही प्रकारे उचकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव (चोप) : देसाईगंज तालुक्यातील बोळधाटोली, रावणवाडी गावाशेजारी आलेल्या जंगली हत्तींच्या कळपाने धानपीकाचे चांगलेच नुकसान केले आहे. गुरूवारी तर या हत्तींच्या दहशतीमुळे टोली गावातील नागरिकांनी अक्षरश: घराच्या छतांवर चढून रात्र जागून काढली. रिमझिम पाऊस असतानाही त्याची पर्वा न करता नागरिक जीवाच्या भीतीने घरांवर ठाण मांडून बसले होते.
शंकरपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३ मध्ये हत्ती पोहोचले. कोरेगाव चोप, बोळधा, रावनवाडी टोली परिसरात काही प्रमाणात नागरिकांना या जंगली हत्तींचे कुतुहल होते. पण त्यांनी केलेले नुकसान पाहून दहशत पसरली. दरम्यान वनविभागाने नागरिकांनी सतर्क राहून हत्तींना कुठल्याही प्रकारे उचकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
जंगली हत्तीचा कळप ओडिसा राज्यातून छत्तीसगड आणि तेथून काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात आला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात देसाईगंज तालुक्यातील पोटगाव, विहीरगाव, पिंपळगाव, चिखलगाव परिसरात हे हत्ती आले होते. त्यावेळी धान पिकासह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर ते परत गेल्याने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. यावर्षी कुरखेडा तालुक्यातून हत्तींचा कळप देसाईगंज तालुक्यातील बोळधा, रावणवाडी टोली, कोरेगाव, चोप जंगल परिसरात दोन दिवसांपूर्वी दाखल झाल्याची माहिती वनविभागाकडून गावात दवंडीद्वारे देऊन नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे सूचित केले. काही गावकऱ्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करून जंगलाच्या दिशेने हत्ती बघण्यासाठी धाव घेतली.
हत्तींच्या कळपावर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्र सहाय्यक विजय कंकलवार, वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे, राकेश आसलवार आणि वनविभागाची चमू देखरेख ठेवून आहे.
वाघासोबत आता हत्तींचे संकट
या कळपात १८ ते २३ हत्ती असल्याचे सांगितले जात आहे. या हत्तींच्या हालचालींकडे वनविभाग लक्ष ठेवून आहे. बोळधा येथील नानाजी गायकवाड, भाऊ वाघाडे, मनोहर मेश्राम, तुकाराम शेंद्रे, गजानन शेंद्रे, सावजी नेवारे व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान हत्तींनी केले. हे हत्ती गावालगत भटकंती करत असले तरी त्यांनी गावात शिरून घरांची किंवा इतर कुठल्याही मालमत्तेची अजूनपर्यंत हानी केलेली नाही.-
या भागात काही दिवसांपासून वाघांची दहशत आहे. त्यात आता हत्तींच्या दहशतीची भर पडली आहे. शुक्रवारी (दि.२३) ला बोळधा येथील डॉ.मंडल यांच्या घराशेजारून हत्तींचा कळप तलावाकडे गेला. त्याच वेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे हे इतर कामानिमित्त बोळधाला होते. त्यांनी हत्तींना कोणीही त्रास देऊ नये, असा सल्ला नागरिकांना दिला.
गावापासून अवघ्या ३०० मीटरवर कळप
गुरुवारी टोली गावातील टेंमली बांध तलावात हत्तींचा कळप असल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली.
गावापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर हा कळप असल्याने टोली गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रिमझिम पाऊस सुरू असतानाही रात्रीच्या वेळी नागरिकांनी घरांच्या छतावर जाऊन हत्ती गावात तर येणार नाही ना, यावर नजर ठेवली.