मोबाईलला ‘फिनिश’ स्टेटस ठेऊन अल्पवयीन मुलीची रेल्वेसमोर आत्महत्या
By दिलीप दहेलकर | Published: November 22, 2023 12:48 PM2023-11-22T12:48:31+5:302023-11-22T12:51:54+5:30
ती अकरावी विज्ञान शाखेला शहरातील कॉलेजला शिकत हाेती
गडचिरोली : स्वत:च्या मोबाईलला ‘फिनिश’ स्टेटस ठेऊन जिल्ह्याच्या वडसा रेल्वे स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी बुधवारला सकाळी १०.३४ वाजता घडली. जान्हवी राजू मेश्राम असे मृतक मुलीचे नाव आहे. ती अकरावी विज्ञान शाखेला शहरातील कॉलेजला शिकत हाेती.
जान्हवी ही देसाईगंजच्या भगतसिंग वार्डात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. जान्हवीचे वडील रेल्वेच्या पलीकडे तिला शिकवणीला सोडून सकाळी घरी परतले होते. सकाळी वडसाहून बल्लारशाहकडे जाणारी ट्रेन क्रमांक ०८८०२ ही गाडी ४३ मिनिटे उशिराने वडसा स्थानकात पोहोचली. दरम्यान वडसाहून बल्लारशाहला निघालेल्या स्थानकापासून १०० मीटर अंतरावर जान्हवीने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिस दल आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या तरुणीने आपल्या मोबाईलवर ‘फिनिश’ असे स्टेटस ठेवले होते, असे माहीती आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.