संपत्तीच्या वादातून दाम्पत्याला संपविले; वृद्धाचाही मृतदेह नदीपात्रात आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 09:39 PM2024-08-28T21:39:32+5:302024-08-28T21:39:45+5:30
पाच नातेवाईकांना घेतले ताब्यात : करपनफुंडीतील हत्या प्रकरण
गडचिराेली : एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी गावापासून ५ किमी अंतरावर शेतातील झाेपडीत वास्तव्य करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह बांडे नदीत मंगळवारी आढळला हाेता, तर महिलेचा पती बेपत्ता हाेता. बेपत्ता पतीचा मृतदेह घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीपात्रातच बुधवारी आढळला. सुरूवातीला जादूटाेण्याच्या संशयातून महिलेची हत्या झाल्याचा संशय पाेलिसांना हाेता; परंतु सखाेल चाैकशी सुरू असतानाच संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समाेर आले. याप्रकरणी पाेलिसांनी पाच नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी गावातील बुर्गाे रैनू गाेटा (५५) या महिलेचा मृतदेह मंगळवारी बांडे नदीपात्रात आढळला हाेता, तर तिचा पती रैनू जंगली गाेटा (६०) हा बेपत्ता हाेता. करपनफुंडी गावापासून ५ किमी अंतरावरील जांभिया व बांडे नदीच्या संगम किनारी असलेल्या शेतातील झाेपडीत हे दाम्पत्य वास्तव्य करीत हाेते. शनिवार, २४ ऑगस्टपासून ते दाेघेही बेपत्ता हाेते. कुटुंबीय त्यांचा शाेध घेत असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता नदी संगम परिसरात कुजलेल्या स्थितीत बुर्गाे गाेटा हिचा मृतदेह आढळून आला. मात्र, पती रैनू गाेटा हा बेपत्ता हाेता. बुधवारी त्याचा मृतदेह घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीपात्रातच आढळला.
झाडाझडतीमध्ये नातेवाईकांची कबुली
पाेलिसांना सुरूवातीला जादूटाेण्याच्या संशयातून महिलेची हत्या झाली असावी, असा संशय हाेता; परंतु तपासाची चक्रे फिरवताच काही नातेवाईकांवर संशय आला. त्यानंतर पाच नातेवाईकांना ताब्यात घेऊन झाडाझाडती घेतली असता संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचे समाेर आले, अशी माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी सखाेल तपास बुर्गी पाेलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी साेमनाथ पुरी करीत आहेत.