विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 10:20 AM2023-01-21T10:20:56+5:302023-01-21T10:24:31+5:30

विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर संशय

A storm arose over the name of the Gondwana University Gadchiroli; oppose the name of Dattaji Didolkar | विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध

विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध

Next

गडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या निर्माणाधीन सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडाेळकर यांचे नाव देण्याचा ठराव सिनेटने १७ जानेवारीला संमत केला. डिडाेळकर यांचे गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात काेणतेही याेगदान नाही, त्यामुळे हा ठराव रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदाेलन करू, असा इशारा शुक्रवारी (दि. २०) विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पत्रकार परिषदेत दिला.

गाेंडवाना विद्यापीठाच्या सिनेटची सभा १७ जानेवारी राेजी पार पाडली. या सभेत सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यापीठाच्या निर्माणाधीन सभागृहाला स्व. दत्ताजी डिडाेळकर यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. हा ठराव २२ सदस्यांच्या बहुमताने पारित करण्यात आला. यावेळी १२ सदस्यांनी ठरावाला विराेध दर्शवला. डिडाेळकर यांचे चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काेणतेही याेगदान नाही. बहुतेकांना त्यांचे नावसुद्धा माहीत नाही. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी याेगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी किंवा आदिवासींच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे नाव सभागृहाला द्यायला पाहिजे हाेते. मात्र, याचा सिनेट सदस्यांना विसर पडल्याचा आराेप यावेळी करण्यात आला.

या पत्रकार परिषदेत विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून सिनेट सदस्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राेहिदास राऊत, राज बन्साेड, गुलाबराव मडावी, सुधा चाैधरी, कुसुम आलाम आदी उपस्थित हाेते.

विद्यापीठाने फेटाळले आराेप

पत्रपरिषदेत करण्यात आलेले आराेप कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी फेटाळले. सिनेट सदस्य हे लाेकशाही मार्गाने व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ चे पालन करून सदस्य झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी करणे चुकीचे आहे. मागील १३ महिन्यांत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या कामांबाबत पत्रकार परिषद घेतली असती तर जास्त चांगले झाले असते, अशी भावना कुलगुरूंनी व्यक्त केली.

Web Title: A storm arose over the name of the Gondwana University Gadchiroli; oppose the name of Dattaji Didolkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.