वाघ शेतात आला अन् बांधलेल्या बैलावर हल्ला केला; शेतकरी ओरडताच जंगलात ठाेकली धूम
By गेापाल लाजुरकर | Published: October 8, 2023 03:01 PM2023-10-08T15:01:11+5:302023-10-08T15:01:23+5:30
चामाेर्शी टाेलीतील घटना, आरमोरी वनपरिक्षेत्रातील चामोर्शी परिसरात सध्या वाघ आणि हत्तींचा वावर आहे.
गडचिराेली : जंगलातून चाेर पावलांनी शेतात वाघाने प्रवेश केला आणि चराईसाठी बांधीत बांधलेल्या बैलांच्या जाेडीवर वाघाने हल्ला केला; परंतु शेतकऱ्यांने आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठाेकली. ही घटना आरमाेरी तालुक्यातील चामोर्शी टोली येथे शनिवार ७ ऑक्टाेबर राेजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्यात एक बैल जखमी झाला
आरमोरी वनपरिक्षेत्रातील चामोर्शी परिसरात सध्या वाघ आणि हत्तींचा वावर आहे. हत्तीच्या कळपाने शुक्रवारी रात्री येथील अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस केली. तसेच चामोर्शी टोली येथील शेतकरी किरण घोडाम यांनी गावालगत असलेल्या आपल्या शेतात शनिवारी चराईसाठी बैलजोडी बांधली असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास जंगलातून शेताच्या दिशेने आलेल्या वाघाने एका बैलावर हल्ला केला. ही बाब शेतकरी घाेडाम यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ माघारी फिरला व बैलाचा जीव वाचला; परंतु या हल्ल्यात बैल जखमी झाला.
वाघांची जाेडी याच जंगलात
आरमाेरी वन परिक्षेत्रातील रामाळा-वैरागड मार्गालगत २९ सप्टेंबर राेजी रात्री ८:५० वाजता वाघांची जाेडी काही तरुणांना दिसून आली हाेती. त्यामुळे वन विभाग अलर्ट झाला हाेता. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या हाेत्या. विशेष म्हणजे, रामाळा-वैरागड व चामाेर्शी माल गावाचे जंगल लागूनच आहे. त्यामुळे चामाेर्शी टाेली येथील बैलाला जखमी करणारा वाघ त्याच जाेडीतील असण्याची शक्यता आहे.