वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

By गेापाल लाजुरकर | Published: December 27, 2022 08:50 PM2022-12-27T20:50:01+5:302022-12-27T20:50:22+5:30

जेरबंद केव्हा करणार?; गडचिरोली तालुक्यातील लोकांमध्ये आक्रोश

A tigress in Gadchiroli is targeting people by grabbing their throats to nurture her cubs. | वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

Next

गडचिरोली : तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नरभक्षक वाघांचा धुमाकूळ आहे. १२ ते १५ किमीच्या जंगल परिसरात वावरून शेतकरी व अन्य लोकांचा बळी वाघ घेत आहेत. ह्या वाघांनी एवढी दहशत वाढविली की लोकांनी जंगलात जाणेच बंद केले. तेव्हा हल्ले थांबले; परंतु जंगलात न जाताही आता शेतात जाणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांचा बळी घेत आहेत. आता तर चार पिल्ले सांभाळणाऱ्या वाघिणीची भूक एवढी वाढली की  पिलांचे पालनपोषण करण्यासाठी वाघीण लोकांनाच लक्ष्य करून त्यांचे गळे पकडत आहे. त्यामुळे वाघिणीला केव्हा जेरबंद करणार, असा प्रश्नरुपी आक्रोश तालुक्यातील लोकांमध्ये आहे.

२०१९ पासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांची दहशत वाढली असली तरी, गेल्या तीन महिन्यापासून नरभक्षक वाघिणीने तालुक्यातील जेप्रा, दिभना, राजघाटा चेक आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, अमिर्झा, कळमटोला चुरचुरा जंगल परिसरात धुमाकूळ घालून लोकांचा बळी घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून ही वाघीण चार पिलांना जंगलात गुप्त ठिकाणी लपवून ठेवून ती याच भागातील शेतशिवारात आपले भक्ष्य शोधते. नरभक्षक वाघिणीसह अन्य वाघांवर देखरेख ठेवण्यासाठी व लोकांना सतर्क करण्यासाठी वन विभागाने दिभना परिसरात सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली. ही पथके सकाळपासून सायंकाळपर्यंत जंगलात ठाण मांडून असतात. तरीसुद्धा नागरिक जंगलात अथवा जंगलालगतच्या शेतशिवारात जाण्याचा मोह आवरत नाहीत.

परिणामी मनुष्यावरील हल्ले वाढत आहेत. शेवटी शेतकरी सुद्धा करणार तरी काय शेती असल्याने त्यांना प्रत्यक्ष शेतात पिकाची पाहणी अथवा वेगवेगळ्या कामासाठी जावेच लागते. यापूर्वी तर वाघ वाघीण जंगलात येणाऱ्या लोकांवरच हल्ले करीत होते. आता तर शेतशिवारात काम करणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांना यमसदनी पाठवत आहेत. याला जबाबदार कोण वनविभाग की स्वतः शेतकरी हे सुद्धा सांगणे कठीण आहे. कारण जागृती करणे वन विभागाचे काम आहे तर जंगल व शेतीवर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असल्याने त्यांनाही तेथे जाण्यापासून रोखता येत नाही.

टी-६ वाघिणीने घेतले १० बळी

गडचिरोली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटोला, धुंडेशिवणी व चुरचुरा जंगल परिसरात गेल्या सात महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या टी-६ वाघिणीने आतापर्यंत ९ लोकांचा बळी घेतला होता. आंबेटोला येथील घटनेनंतर बळींची संख्या आता १० झाली. बळी गेलेल्यांमध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये कळमटोला येथील २, तर धुंडेशिवणी, चुरचुरा, अमिर्झा, राजगाटा चक, दिभना, आंबेशिवणी, राजगाटा माल व आंबेटोला येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

पोटभर शिकारीसाठी वाघीण झाली आक्रमक

एका वाघासाठी किमान ४५ ते ६० चौ.कि.मी. जंगलक्षेत्र आवश्यक असते, तर मादी वाघ कोणत्याही वाघाच्या क्षेत्रात जाऊ शकते. पिलांसह वावरणारी वाघीण ८ ते १० किमी परिसरात वावरते व भक्ष्य शोधते. दिभना जंगलक्षेत्रात असलेल्या वाघिणीला तेवढे क्षेत्र मिळत नसल्याने. अल्प क्षेत्रातच ती वावरते. याच क्षेत्रात ती भक्ष्य शोधते. चार पिल्ले असल्याने पोटभर शिकार मिळावी यासाठी ती मिळेल त्या प्राण्यांची शिकार करते. ती माणसावरही तुटून पडते.

वाघिणीची दोन वाघांशी संगत

हल्लेखोर टी-६ वाघिणीला जी-१ व जी-१० ह्या दोन वाघांची संगत आहे. जी-१ हा वाघ गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी व धानोरा तालुक्यातील काही भागात वावरतो तर जी-१० हा वाघ गडचिरोली तालुक्यासह आरमोरी तालुक्यातील जंगलात वावरतो.त्याला वडसा वन विभागात टी-५ नावाने ओळखले जाते. दोन वाघ, एक वाघीण व चार पिल्ले असा वाघांचा गोतावळा गडचिरोली तालुक्यातील जंगलात वावरून धुमाकूळ घालत आहे.

वाघिणीला पिलांसह पकडण्याची परवानगी मिळाली आहे; परंतु वाघ पकडणारे ताडोबा व अमरावतीचे पथक उपलब्ध नाही. ती पथके दुसऱ्या ठिकाणी वाघ पकडण्यात व्यस्त आहेत. पिलांसह जेरबंद करणे कठीण असले तरी, पथके उपलब्ध झाल्यानंतर तातडीने वाघिणीला पिलांसह जेरबंद केले जाईल.- डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली

Web Title: A tigress in Gadchiroli is targeting people by grabbing their throats to nurture her cubs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.