दुचाकीने गावात पोहोचून गरोदर महिलेवर केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 05:00 AM2022-07-17T05:00:00+5:302022-07-17T05:00:25+5:30
दोड्डुर गाव गट्टा येथून अंदाजे २० कि.मी. अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पावसाळ्यात जात नाही. तरीही डाॅ. वड्डे यांनी एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दुचाकीने चिखलमय रस्त्याने वाट काढत दोड्डुर गाव गाठले आणि जिजावर उपचार सुरू केले. पाऊस कमी झाल्यानंतर तिला शुक्रवारी काही किलोमीटर दुचाकीने आणि नंतर रुग्णवाहिकेने आणून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : त्या गरोदर महिलेच्या पोटातील गर्भाने ९ महिने पूर्ण केले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रसवकळा येण्याची शक्यता होती. त्यातच ती मलेरियाने ग्रस्त झाली. तिची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आणि गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने भर पावसात चिखलाच्या वाटेने दुचाकी चालवीत त्या महिलेचे गाव गाठले. तिच्यावर तेथेच उपचार केले. एवढेच नाही तर तिला एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात आणून भरती केले.
एका महिलेवर उपचारासाठी अशी धडपड करून वैद्यकीय सेवेसाठी आदर्श निर्माण करणारे ते डॉक्टर आहेत नितेश वड्डे. प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा अंतर्गत येत असलेल्या दोड्डुर (टोला) येथील जिजा अजय कोरसा (२० वर्षे) या गर्भवतीचे ९ महिने भरले होते. त्यातच ती मलेरिया पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिची प्रकृती बुधवारी अधिकच बिघडल्याची माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन कन्नाके यांना मिळाली. त्यांनी ही माहिती गट्टाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितेश वड्डे यांना दिली.
डॉ. वड्डे यांनी पावसाची तमा न बाळगता दुचाकीने तिचे गाव गाठून उपचार केले.
पावसाच्या दिवसात तालुक्यात अनेक गावांत नदी, नाले तसेच रस्त्याअभावी रुग्णवाहिका किंवा दुचाकी वाहनानेही जाणे कठीण असते. नदीतून नावेने किंवा पाण्यातून पायी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी दुर्गम भागात सेवा देत आहेत.
२० किलोमीटरचे अंतर, चिखलमय रस्ता
- दोड्डुर गाव गट्टा येथून अंदाजे २० कि.मी. अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पावसाळ्यात जात नाही. तरीही डाॅ. वड्डे यांनी एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दुचाकीने चिखलमय रस्त्याने वाट काढत दोड्डुर गाव गाठले आणि जिजावर उपचार सुरू केले. पाऊस कमी झाल्यानंतर तिला शुक्रवारी काही किलोमीटर दुचाकीने आणि नंतर रुग्णवाहिकेने आणून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले.