तीन महिन्यांपूर्वी कळपातून भरकटलेला रानटी टस्कर हत्तीची थेट गावात ‘एन्ट्री’
By गेापाल लाजुरकर | Published: October 21, 2024 10:27 PM2024-10-21T22:27:23+5:302024-10-21T22:28:42+5:30
चांभार्डा येथे दहशत, सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास हत्तींने चांभार्डा टाेली येथील मुख्य वस्तीतील रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू केले.
गडचिराेली : गत तीन वर्षांपासून रानटी हत्तींचा वावर शेतीसह जंगलात दिसून आलेला आहे; परंतु साेमवार, २१ ऑक्टाेबर राेजी सायंकाळी ६:३० वाजता गडचिराेली तालुक्याच्या चांभार्डा टाेली येथील रस्त्यावर एन्ट्री केली. गावात १५० ते २०० मीटर ऐटीत चालला. यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले. तत्पूर्वी सायंकाळी टस्कर हत्तीने धान पिकाची नासधूसही केली.
तीन महिन्यांपूर्वी रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेला टस्कर हत्ती विविध भागात वावरत हाेता. हा हत्ती यापूर्वी वडधा परिसरातील सिर्सी बिटात येऊन पुन्हा कुरखेडा व देसाईगंज तालुक्यातून गाेंदिया जिल्ह्यात गेला हाेता. त्यानंतर हा हत्ती १९ ऑक्टाेबर राेजी रात्रीच्या सुमारास आरमोरी तालुक्यात आला. मेंढा, उराडी, मोहझरी, डोंगरतमासी, विहीरगाव मार्गे नरोटीमाल व डार्ली परिसरात ताे दाखल झाला. रविवारी नराेटी माल येथील पत्रू मडावी व मोरेश्वर चालीरवार या दोन शेतकऱ्यांच्या शेतातून मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १७ मध्ये ताे दाखल झाला. रविवारच्या रात्री याच भागात हा हत्ती वावरत हाेता. दरम्यान, साेमवार २१ ऑक्टाेबर राेजी सायंकाळी हत्तीने चांभार्डा टाेली परिसरातील शेतशिवारात प्रवेश केला. या भागातील धान पिकाची नासधूस केल्यानंतर सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास हत्तींने चांभार्डा टाेली येथील मुख्य वस्तीतील रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू केले. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. त्यानंतर हत्तींने जंगलाच्या दिशेने आगेकुच सुरू केली.
२८ हत्तींचा कळप कळमटाेला जंगलात
मागील आठवडाभरापासून रानटी हत्ती चुरचुरा- दिभनाच्या जंगलात आहेत. साेमवारी हत्तींच्या कळपाने कळमटाेला शेतशिवारात एन्ट्री केली. या कळपात लहानमाेठ्या एकूण २८ हत्तींचा समावेश आहे. हत्तींच्या कळपापासून उत्तरेला अगदी ७ किमी अंतरावर टस्कर हत्ती साेमवारी आला हाेता.