अस्वलाशी आधी एकटाच झुंजला, शेतकरी धावले म्हणून बचावला
By संजय तिपाले | Published: August 3, 2023 02:35 PM2023-08-03T14:35:28+5:302023-08-03T14:37:01+5:30
मुरुमगावची घटना: धान रोवणी करताना हल्ला: जखमी तरुणावर उपचार सुरु
गडचिरोली : धान रोवणीच्या कामात व्यग्र असलेल्या तरुणावर अस्वलाने हल्ला चढविला. सुरुवातीला त्याने एकट्यानेच अस्वलाशी झुंज दिली, पण प्रतिकार करतानाच आरडाओरड केल्याने इतर शेतकरी धावले व त्यांनी अस्वलाच्या तावडीतून त्यास सोडवले. ही घटना धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
अशोक फरदीया (३७, रा. मुरूमगाव )असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे धान राेवणीची कामे खोळंबली होती. पाऊस थांबल्यानंतर आता पुन्हा कामे वेगात सुरु आहेत. अशोक फरदीया हा स्वत:च्या शेतात धान रोवणी करत होता. यावेळी अस्वलाने अचानक हल्ला चढविला. डोक्यात पंजा मारल्याने मोठी दुखापत झाली. अशोक यांनी सुरुवातीला त्याच्याशी प्रतिकार केला, पण नंतर ओरडून इतर शेतकऱ्यांना बोलावले. त्यानंतर शेतकऱ्रूांनी धाव घेत अस्वलाला पिटाळून लावले. ते जंगलाच्या दिशेन पळूना गेले. जखमी अशोक फरदीया यांना तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्यातर गंभीर जखम झाली असून प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
शेतकऱ्यांत दहशत
दरम्यान, मुरुमगावजवळ घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे हिंसक प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. धान रोवणी कामाच्या लगबगीत ही घटना घडल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व तातडीने जखमी शेतकऱ्यास आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.