मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला
By गेापाल लाजुरकर | Published: November 13, 2023 09:52 PM2023-11-13T21:52:21+5:302023-11-13T21:53:27+5:30
१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते.
गडचिराेली : मित्रांसोबत वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला. ही घटना कुनघाडा रै. ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर साेमवार १३ नाेव्हेंबर राेजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या युवकाची शाेधमाेहीम सायंकाळपर्यंत सुरू हाेती; परंतु युवकाचा शाेध लागला नाही. करण गजानन गव्हारे (२५) रा. कुनघाडा रै. (ता. चामाेर्शी)असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते. त्यापैकी तीन युवक नदीपात्रात असलेल्या नावेवर बसून नाव चालविण्यात मग्न होते. नाव पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेली. ती बुडण्याच्या स्थितीत असताना तिन्ही युवक पाण्याखाली उडी मारून कसेबसे बाहेर हाेते; तेव्हा करण गव्हारे हा खोल पाण्याच्या बाहेर होता. मात्र एक मित्र बुडत असल्याचे समजताच करणने पाण्यात उडी घेतली. ताे प्रवाहाच्या दिशेने गेला, मात्र त्याला पाण्याच्या खाेलीचा अंदाज आला नाही व तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील दिलीप श्रुंगारपवार, तलाठी नितीन मेश्राम, कोतवाल नेताजी वाघाडे व नातेवाईक हजर होते. त्यानंतर पाेलिसांना माहिती देण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत शाेधमाेहीम राबविण्यात आली.