सबसिडीसाठी आधार नंबर आवश्यक
By admin | Published: May 9, 2016 01:33 AM2016-05-09T01:33:23+5:302016-05-09T01:33:23+5:30
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या सबसिडीसाठी प्रत्येक व्यक्तीला आधार नंबर सक्तीचा केला आहे.
आरमोरीत बैठक : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती
आरमोरी : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या सबसिडीसाठी प्रत्येक व्यक्तीला आधार नंबर सक्तीचा केला आहे. यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार नंबर अत्यावश्यक आहे. आधार नंबर विना नागरिक विविध शासकीय योजनेच्या लाभांपासून वंचित राहू शकतात, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र चांदुरकर यांनी दिली.
शनिवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात परवानाधारक स्वस्त धान्य दुकान व केरोसीन दुकानदारांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारने २६ मार्च २०१६ रोजी संसदेमध्ये शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचा कायदा पास करण्यात आला. स्वस्त धान्य दुकान व केरोसीन दुकानदारांकडून तांदूळ, गहू, केरोसीनचा लाभ घेत असतील अशा व्यक्तींचा आधार नंबर २५ मे पर्यंत पुरवठा कार्यालयात जमा करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आधार कार्ड नंबर असल्यास नागरिक स्वस्त धान्य व केरोसीनच्या सबसीडीपासून वंचित राहणार नाही, १०० टक्के आधार नंबर सर्व परवानाधारक दुकानात असावेत, असेही ते म्हणाले. या बैठकीला तहसीलदार मनोहर वलथरे, नायब तहसीलदार दामाजी नैताम, पुरवठा निरिक्षक आशिष फुलुके, अव्वल कारकून रेखा मने, लिपीक संतोष सोनकुसरे व तालुक्यातील स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक विक्रेते उपस्थित होते. या बैठकीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या प्रणालीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)