'आनंदाचा शिधा' लांबणीवर; दिवाळीच्या उत्सवावर विरजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:27 PM2024-10-30T15:27:47+5:302024-10-30T15:29:48+5:30
लाभार्थ्यांचा हिरमोड : शिधापत्रिकाधारकांची दुकानदारांना विचारणा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वस्त धान्याचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्यावतीने १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जातो. यावर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिधा मात्र आचारसंहितेमुळे वितरित झाला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
उत्सव काळात स्वस्त धान्य लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने १०० रुपयांत चार प्रकारचे शिधा जिन्नस दिले जातात. दिवाळी सणानिमित्त मागील वर्षी शिधा जिन्नसचे वाटप करण्यात आलेले होते; परंतु यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आनंदाचा शिधा वितरणात अडचणी आहेत. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबरपासून रास्त भाव दुकानदारांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असला, तरी लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात शेकडो रास्तभाव दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय, प्राधान्य गट योजनेचे हजारो लाभार्थी आहेत. या सर्वांना सरकारने सण-उत्सव काळात आनंदाचा शिधा ही योजना रास्त दुकानाच्या माध्यमातून देणे सुरू केले.
प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा मिळू लागला. या दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता होती; परंतु मध्येच आचारसंहिता सुरू झाल्याने ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा वितरणात आडकाठी येत असल्याचे दिसून येते.
लाभार्थ्यांचा प्रश्न, शिधा केव्हा मिळणार?
१ नोव्हेंबरपासून धान्य वाटप करणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला होता. तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन दिले होते; परंतु कारवाईच्या इशाऱ्याने दुकानदार नरमले व आंदोलन मागे घेतले. आनंदाचा शिधा कधी मिळणार, म्हणून लाभार्थी रास्त भाव दुकानदारांना विचारत आहेत. आचारसंहिता सुरू असल्यामुळे आनंदाचा शिधा हा नवीन सरकार आल्यानंतरच मिळेल काय, असा सवाल लाभार्थ्यांचा आहे.
धान्य लाभार्थी कार्डधारकांची संख्या
अहेरी १२,४८४ ८,९१८
आरमोरी ६,०४६ १७,०१४
भामरागड ५,७९७ २,०७०
चामोर्शी १३,०५६ २८,८३०
देसाईगंज ४,५८३ १२,९३०
धानोरा ११,१२६ ४.६२१
एटापल्ली ९,७२९ ३,८७९
गडचिरोली ९,११० १८,५८०
कोरची ५,१०९ ४,७३८
कुरखेडा ११,३६० ६,९३६
मुलचेरा ५,४१० ४.९२९
सिरोंचा ८,००९ ८,०५५
एकूण १,०१,८१९ १,२१,४८३
२०२२ पासून आनंदाचा शिधा
लाभार्थ्यांना आनंदाच्या शिध्यात साखर, पामतेल, रवा, मैदा, तूरडाळ, आदी शिधा जिन्नस प्रत्येकी एक किलो मिळते. २०२२ पासून दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती सणाला आनंदाचा शिधा मिळाला होता.