अहेरी आगारातील एसटी बसच्या ९५ टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:08 AM2018-06-09T00:08:44+5:302018-06-09T00:08:44+5:30

वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला.

About 95 percent of ATHRI ST buses will be canceled | अहेरी आगारातील एसटी बसच्या ९५ टक्के फेऱ्या रद्द

अहेरी आगारातील एसटी बसच्या ९५ टक्के फेऱ्या रद्द

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : अहेरी आगारात एसटी कर्मचाºयांचा बेमुदत अघोषित संप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/अहेरी : वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला. दिवसभर या आगारातील ९५ टक्के बसफेऱ्या रद्द झाल्या. गडचिरोली आगारातील बसफेऱ्या मात्र दिवसभर सुरू होत्या.
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या कामगार कराराची घोषणा राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी अलिकडेच केली. मात्र हा करार काही एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने अचानक शुक्रवारी रात्री एसटी कर्मचाऱ्यांच्या काही कामगार संघटनांनी संप पुकारला. अहेरी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच संपात सहभाग घेतल्याने या आगारातील बसफेऱ्या प्रभावित झाल्या. अहेरी आगारातून दिरदिवशी ९५ बसफेऱ्या जातात. मात्र शुक्रवारी केवळ सहा बसफेऱ्या गेल्या.
अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाबाहेर बैठे आंदोलन केले. दरम्यान शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजीही केली. अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे हाल झाले. त्यांना बराच वेळ बसेसची प्रतीक्षा करावी लागली.
गडचिरोली आगारातील बससेवा मात्र सकाळपासून दिवसभर सुरू होती. गडचिरोली आगारातून दरदिवशी १७७ बसफेऱ्या सोडल्या जातात. त्यापैकी १७० बसफेऱ्या सुटल्या. गडचिरोली आगारात या संपाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्याचबरोबर गडचिरोली आगारातील एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही.
एसटी व्यवस्थापनाने संप ठरविला बेकायदेशीर
एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्यापूर्वी कोणतीही नोटीस एसटी व्यवस्थापनाला दिली नव्हती. त्यामुळे सदर संप नसून ती कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा होती, असे एसटी प्रशासन माणून सदर संप अवैध घोषित केला आहे. या संपात सहभागी झालेल्या अहेरी आगारातील ४५ व ब्रह्मपुरी आगारातील ३५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दोन्ही आगारातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई विभाग नियंत्रक यांनी केली आहे. राज्यभरात ज्या आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, त्या आगारातील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. निलंबनाची कारवाई झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारपासून कर्मचारी कामावर परतण्याची शक्यता आहे.

Web Title: About 95 percent of ATHRI ST buses will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.