विद्यार्थ्यांचे बँक खातेक्रमांक गोळा करण्याची लगबग
By admin | Published: April 21, 2017 01:09 AM2017-04-21T01:09:12+5:302017-04-21T01:09:12+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ४०० रूपये अनुदान देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. अनुदानाची रक्कम
शिक्षण विभाग लागला कामाला : गणवेशासाठी खाते आवश्यक
गडचिरोली : प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ४०० रूपये अनुदान देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाचे कर्मचारी व शिक्षक विद्यार्थ्यांचे बँक खाते गोळा करीत आहेत.
आजपर्यंत शिक्षण विभाग वस्तू खरेदी करून सदर वस्तू संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत होता. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते. त्याचबरोबर वस्तूचा दर्जाही अत्यंत खालावलेला राहत होता. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने अनुदानाची रक्कम सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण यावर्षीपासून अवलंबिले आहे. या योजनेत सुरूवातीला पाठ्यपुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांचे बँक खाते वेळेवर गोळा न झाल्यास विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहण्याचा धोका होता. पहिल्या दिवशी पुस्तक न मिळाल्यास शासनावर मोठ्या प्रमाणात टिका होण्याची शक्यता असल्याने शासनाने सदर निर्णय मागे घेतला. त्यानंतर थेट अनुदानाची योजना गणवेशासाठी लागू केली. गणवेशही शाळेच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध व्हावे, असा शासनाचा हेतू आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. सुट्या लागण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक गोळा करण्यास सांगण्यात आले आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी सहजासहजी शाळेत येत नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचे बँक खाते गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बँक खाते काढण्यास सांगितले जात आहे. १ मे पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते काढून ते शिक्षण विभागाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)