जिल्ह्यातील साडेपाच हजारांवर शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:36 AM2021-01-20T04:36:09+5:302021-01-20T04:36:09+5:30
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसह नगर पालिका, ...
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसह नगर पालिका, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित, तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून या चार वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ५ हजार ८५९ शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी आराेग्य विभागासह शिक्षण विभाग कामाला लागला आहे. चार वर्गांतील ५५ हजार ५५९ विद्यार्थ्यांना शाळेत बसविण्यात येणार आहे.
बाॅक्स...
पालकांचे हमीपत्र आवश्यक
यापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्व शाळांनी संबंधित पालकांचे हमीपत्र घेतले. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी त्या पालकांकडून हमीपत्र घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तालुकास्तरावर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठका पार पडल्या आहेत. आता दाेन दिवसांनंतर सर्व शाळांचे शिक्षक इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हमीपत्रासाठी पालकांची मनधरणी करणार आहेत. परिपूर्ण प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना या शाळेत आणा, अशा सूचना असल्याने शिक्षक कामाला लागणार आहेत.
काेट...
शासनाच्या १५ जून २०२० च्या जीआरनुसार इयत्ता पाचवी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. यात गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची चाचणी आधी हाेईल. त्यानंतर भाषा व सामाजिकशास्त्र विषयांच्या शिक्षकांची चाचणी हाेईल. सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- आर.पी. निकम, शिक्षणाधिकारी (प्राथ.)