अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने पं. स. ची आढावा बैठक रद्द
By admin | Published: April 21, 2017 01:13 AM2017-04-21T01:13:37+5:302017-04-21T01:13:37+5:30
गडचिरोली पंचायत समितीमार्फत विविध शासकीय योजनांची सुरू असलेली अंमलबजावणी तसेच पं. स. अंतर्गत
पूर्व सूचना दिली होती : खासदार, आमदारांनी व्यक्त केली नाराजी
गडचिरोली : गडचिरोली पंचायत समितीमार्फत विविध शासकीय योजनांची सुरू असलेली अंमलबजावणी तसेच पं. स. अंतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी खा. अशोक नेते यांनी गुरूवारी गडचिरोली पंचायत समितीची आढावा बैठक बोलाविली होती. मात्र या बैठकीला अनेक अधिकारी अनुपस्थित होते. तर बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी स्वत: बैठकीला उपस्थित न राहता आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले. बैठकीला अधिकारी उपस्थित न झाल्याने खासदार अशोक नेते यांनी पंचायत समितीची ही आढावा बैठक रद्द केली, अशी माहिती पं. स. चे उपसभापती विलास दशमुखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ग्राम पंचायतस्तरावर होणाऱ्या विकास कामांवर तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर पं. स. प्रशासनाचे नियंत्रण असते. ग्रामीण भागाचा विकास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर आहे. त्यामुळे खासदार, आमदार पंचायत समितीची आढावा बैठक दरवर्षी घेतात. पं. स. स्तरावरून रखडलेल्या विकास कामांना तसेच विविध समस्या मार्गी लावण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने अशा बैठकीतून होत असते. मात्र आजच्या आढावा बैठकीला बरेचसे अधिकारी अनुपस्थित असल्याने खासदार, आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, तहसीलदार संतोष खांडरे, बीडीओ यू. डी. पचारे, जि. प. सदस्य मीना कोडाप, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, रेखा डोळस तसेच पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची निष्क्रियता खपवून घेणार नाही
लेखी पूर्व सूचना देऊन पंचायत समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र अनेक अधिकारी या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. विकास कामे व विविध शासकीय योजनेच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांची निष्क्रियता आपण खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद खा. अशोक नेते यांनी यावेळी बोलताना दिली.
गडचिरोली पं. स. तील सभागृहाच्या अद्यावतीकरणासाठी खासदार फंडातून निधी देण्यास खा. अशोक नेते यांनी सकारात्मकता दाखविली आहे. त्यामुळे पं. स. सभागृहात साऊंडसिस्टीम व इतर सुविधा होणार आहे, अशी माहिती पं. स. चे उपसभापती विलास दशमुखे यांनी दिली आहे.