पावसाअभावी पºहे करपले, जमिनीला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:17 PM2019-07-23T22:17:37+5:302019-07-23T22:18:09+5:30
गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. पाऊस पडत नसल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला असून जिल्हाभरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मृग, रोहिणी व आर्द्रा या तीन नक्षत्रात अपेक्षित पाऊस जिल्ह्यात झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी निम्मा पाऊस पडला. अपेक्षेच्या तुलनेत पावसाची सरासरी फारच कमी आहे. त्यामुळे तलाव, बोड्या तसेच नदी, नाल्यांमध्ये फारसा पाणीसाठा उपलब्ध नाही. मानापूर, देलनवाडी, वैरागड भागासह देसाईगंज, कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अशाच प्रकारची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे रोवणीयोग्य झाले, असे शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने शेतजमिनीला पाणी पुरवठा करून रोवणीचे काम हाती घेतले आहे. तसेच काही शेतकरी धान पºह्यांना वाचविण्याची सातत्याने धडपड करीत आहेत. काही शेतकºयांनी शेत जमिनीत पाणी पाहून रोवणी करण्यासाठी पऱ्हे खोदून पेंड्या बांधले. मात्र दुसऱ्यांच दिवशी शेतजमिनीतील पाणी आटल्याने खोदलेल्या पेंड्या तशाच कायम आहेत. एकूणच पावसाअभावी जिल्ह्यातील धान पऱ्हे करपले असून रोवणीचे काम खोळंबले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. जवळपास पावणेदोन लाख हेक्टरवर दरवर्षी धान पिकाची लागवड रोवणी व आवत्या स्वरूपात होत असते.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला मुसळधार पाऊस बरसला नाही. मृग व रोहिणी हे दोन नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीला चार दिवस दमदार पाऊस बरसला. या पावसानंतर काही शेतकºयांनी लगबगीने धानाचे पऱ्हे टाकले. तर काहिंनी रोवणीचे काम सुरू केले. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
मानापूर भागात गंभीर स्थिती
पावसाळ्याचे दिवस असून सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असून पावसाचा पत्ता नाही. वरूण राजाची वक्रदृष्टी दिसून येत असल्याने मानापूर, देलनवाडी, तुलतुली भागातील धानपीक हंगाम धोक्यात आला आहे. शेतजमिनीतील पऱ्हे पावसाअभावी करपले असून धानाची रोवणी केलेल्या जमिनीला भेगा पडत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बि-बियाण्यांची व्यवस्था केली. नांगरणी करून रोवणीची तयारी केली. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या भागात पीक परिस्थिती गंभीर आहे.