न्यायाधीशांशी गैरवर्तन भोवले; वादग्रस्त पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 08:55 PM2023-05-25T20:55:49+5:302023-05-25T20:56:11+5:30

Gadchiroli News  चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीच्या धामधुमीत मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर न्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

abused the judge; Controversial police inspector hastily suspended | न्यायाधीशांशी गैरवर्तन भोवले; वादग्रस्त पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

न्यायाधीशांशी गैरवर्तन भोवले; वादग्रस्त पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

googlenewsNext

संजय तिपाले

गडचिरोली: चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीच्या धामधुमीत मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर न्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या ठाण्यात त्यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले, त्याच ठाण्यात त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.


  चामोर्शी बाजार समिती निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांचा पॅनल होता. ते स्वत:ही उमेदवार होते. २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्याच पहाटे ठाण्यात बोलावून  लाथाबुक्क्या  व बुटाने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवेंवर केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते.

त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.  मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत २० मे रोजी पो.नि. राजेश खांडवेंवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी पो.नि. खांडवे हे न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले. गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरुन खांडवे यांनी न्या. मेश्राम यांच्याशी हुज्जत घालून गैरवर्तन केले. त्यानंतर खांडवे हे तेथून निघून आले. यानंतर न्या.मेश्राम यांनी ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना कळवली.  चामोर्शी ठाण्याचा तात्पुरता पदभार उपनिरीक्षक सुधीर साठे यांच्याकडे सोपविला आहे.

एसपींची तत्परता, बेशिस्तीला दणका...
  घडल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने स्वत: खातरजमा केली. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठांना ही बाब कळविली. पो.नि. खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, त्यानंतर त्यांच्याविरुध्द चामोर्शी ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला.  यातून बेशिस्त अधिकाऱ्यांना योग्य तो धडा मिळाला आहे.

Web Title: abused the judge; Controversial police inspector hastily suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.