दंडाची रक्कम कमी करण्यासाठी स्वीकारले २० हजार; लाचखोर अभियंत्याला 'एसीबी'चा 'झटका'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:04 PM2023-10-18T12:04:21+5:302023-10-18T12:06:19+5:30
आलापल्ली येथे रंगेहाथ पकडले
अहेरी/आलापल्ली : घरगुती विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याने दोन लाख २० हजार रुपयांचा दंड केला, त्यानंतर दंडाची रक्कम कमी करून मीटर बदलवून देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करून पहिल्या टप्प्यात २० हजार रुपये स्वीकारणाऱ्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून जोराचा झटका दिला. ही कारवाई १७ ऑक्टोबरला आलापल्ली (ता. अहेरी) येथे करण्यात आली.
विनोदकुमार नामदेव भोयर (४७), असे त्या उपकार्यकारी अभियंत्याचे (वर्ग २) नाव आहे. तो राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, आलापल्ली येथे कार्यरत आहे. एका ग्राहकाच्या घरगुती विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे कारण देत भोयर याने दोन लाख २० हजार रुपयांचा दंड केला. ग्राहकाने दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर दंडाची रक्कम कमी करून ७३ हजार ६९८ रुपये केली. दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर याने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदाराने गडचिरोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळल्यानंतर १७ ऑक्टोबरला सापळा लावला. महावितरण कार्यालयात लाचेची पहिल्या टप्प्यातील २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता भोयरला झडप घालून पकडले.
त्याच्याविरुद्ध अहेरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, शिवाजी राठोड, सहायक उपनिरीक्षक सुनील पेददीवार, हवालदार नथ्थू धोटे, राजेश पदमगीरवार, पो.ना. विक्रमजित सरकार, शिपाई किशोर ठाकूर, संदीप उडाण यांनी कारवाई केली.
वरोरा येथील निवासस्थानी झडती
दरम्यान, आलापल्ली येथे लाच स्वीकारताना पकडल्यावर उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर याच्या कार्यालयासह निवासस्थानीही झाडाझडती करण्यात आली. वरोरा (जि. चंद्रपूर) येथील मूळ निवासस्थानी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तपासणी केली.