माठ तयार करण्याच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:42+5:30
चामोर्शी शहरातील कुंभार समाजाचे कारागिर मातीपासून माठ व इतर वस्तू तयार करीत असतात. हे साहित्य तयार करण्यासाठी येथून १० किमी अंतरावर असलेल्या तळोधी मो. या गावाच्या तलावातील माती ट्रॅक्टरद्वारे चामोर्शीत आणत आहे. प्रती ट्रॅक्टर दोन हजार रुपये प्रमाणे कुंभार समाज बांधवांना मातीसाठी मोजावे लागत आहे. मातीपासून तयार केलेल्या कच्या माठांना भाजण्यासाठी लाकडी जळाऊ बिटाची गरज भासते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरात कुंभार समाज बांधवांची संख्या मोठी असून पूर्वापार चालत आलेल्या माठ बनविण्याच्या व्यवसायावर कुंभार समाज बांधवांचा उदरनिर्वाह सुरू आहे. सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याने आपली तृष्णा भागविण्यासाठी अनेक सर्वसामान्य कुटुंब मातीपासून तयार झालेले माठ आठ दिवसानंतर खरेदी करण्यात येणार आहे. गरीबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठ तयार करण्याच्या कामाला कुंभार समाज बांधवांकडून आता वेग आला आहे.
चामोर्शी शहरातील कुंभार समाजाचे कारागिर मातीपासून माठ व इतर वस्तू तयार करीत असतात. हे साहित्य तयार करण्यासाठी येथून १० किमी अंतरावर असलेल्या तळोधी मो. या गावाच्या तलावातील माती ट्रॅक्टरद्वारे चामोर्शीत आणत आहे. प्रती ट्रॅक्टर दोन हजार रुपये प्रमाणे कुंभार समाज बांधवांना मातीसाठी मोजावे लागत आहे. मातीपासून तयार केलेल्या कच्या माठांना भाजण्यासाठी लाकडी जळाऊ बिटाची गरज भासते. मात्र चामोर्शी येथे अशा प्रकारचे लाकडाचे बिट उपलब्ध होत नसल्याने कुंभार समाज बांधवांना घोटमधून हे जळाऊ लाकूड आणावे लागत आहे. हजारो सर्वसामान्य लोकांची तृष्णा भागविणारा कुंभार समाज बांधव मात्र विकासापासून कोसोदूर आहे. अद्यापही उपेक्षित जीवन जगत आहे. कुंभार समाज बांधवांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्याचा विकास करण्यासाठी विद्यमान सरकार दुर्लक्ष करीत आहे.
उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असल्याने सध्याच्या आधुनिक युगातही माठ्यांच्या मागणीत फरक पडला नाही. प्रत्येकाच्या घरी माठ असतोच. अक्षयतृतीयापर्यंत माठाची मागणी सातत्याने वाढत असते. ५० ते ८० रुपये असा दर साध्या माठ्यासाठी घेतला जातो. नळासारखी तोटी लावलेला माठ १८० ते २०० रुपये दराने एप्रिल महिन्यात विकला जाईल, अशी माहिती येथील एका कुंभार समाज बांधवाने दिली.