आरमोरी तालुक्यात धान रोवणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:13+5:302021-07-12T04:23:13+5:30
कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला ...
कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला आहे. आता रोवणी सुरू झालेली असल्याने तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना श्री पद्धत, पट्टा पद्धतीने रोवणी व कमी कालावधीची रोपे लागवड केल्यामुळे उत्पन्नात वाढ कशी होते, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
९ कृषी सहायक व २ कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून विस्तार कार्य जोमात करून घेतले जात आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी देलोडा खुर्द येथे स्वतः तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर व कृषी सहायक पी. जे. मेश्राम हजर होते. तालुका कृषी अधिकारी यांनी बोरी चक, वडधा, कुरंजा, देलोडा बु. येथे जाऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे महत्त्व तसेच बांधावर तूर लागवड केलेल्या तुरीचे शेंडे खुडल्यामुळे उत्पन्नात दीड ते दोन पट वाढ होते. याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी धान रोवणीत रासायनिक खते देताना चिखल करता वेळेस पहिला तास मारून झाल्यानंतर खत द्यावे व नंतर त्यावर ट्रॅक्टरचा दुसरा तास मारावा. यामुळे खते मुळांच्या कक्षेत जातील व पाण्याने आणि हवेमध्ये उडून जाणार नाही त्याचा परिपूर्ण वापर होईल व त्यामुळे खताची ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होईल, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. तणनाशकाविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे, की तणनाशक मारल्यानंतर मग खत मारणे हे चुकीचे आहे. तणनाशकामुळे खताची भाप जाते असा समज आहे तो चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले.