भामरागडातील शैक्षणिक सुधारणेचे स्वीकारले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 01:20 AM2017-06-24T01:20:53+5:302017-06-24T01:20:53+5:30
जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण आणि उपस्थितीचे प्रमाण कमी असलेल्या आदिवासीबहुल,
अश्विनी सोनावने रूजू : पुण्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे धाडस
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण आणि उपस्थितीचे प्रमाण कमी असलेल्या आदिवासीबहुल, नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा भामरागड तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्था सुधारण्याचे आव्हान स्वीकारून पुणे येथील गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने यांनी भामरागड तालुक्यात स्वत:ची नियुक्ती मागितली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यांचा हा आव्हानात्मक निर्णय जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
आदिवासीबहुल, मागास व नक्षलग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची राज्यभरात ओळख आहे. त्यामुळे पुणे, मुंबई येथील अधिकारी जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही. एखाद्याची बदली झाली तरी रूजू होऊन वैद्यकीय रजा घेतात व रजेच्या कालावधीत बदली रद्द करण्याचे प्रयत्न चालवितात हा आजपर्यंतचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. मात्र पुणे येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असलेल्या अश्विनी सोनावने यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे भामरागड तालुक्यात स्वत:ची नियुक्ती मागितली.
नियुक्ती मागितल्यानंतर त्या रूजू होणार की नाही, असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र सोनावने यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. तत्पूर्वी त्यांनी शिक्षणाधिकारी एम.एन. चलाख यांच्यासोबत चर्चा केली. अश्विनी सोनावने यांच्या या धाडसी निर्णयाचे शिक्षणमंत्र्यांनीसुद्धा स्वागत केले आहे. त्यांचा हा निर्णय इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.