रस्त्याच्या कडा न भरल्याने अपघाताचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:53+5:302021-02-15T04:32:53+5:30
गडचिराेली : गडचिराेली-आरमाेरी मार्गावरील रस्त्याच्या कडा मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे डांबरी रस्ता व बाजूचा रस्ता ...
गडचिराेली : गडचिराेली-आरमाेरी मार्गावरील रस्त्याच्या कडा मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे डांबरी रस्ता व बाजूचा रस्ता यांच्यामध्ये काही ठिकाणी जवळपास एक फुटाचे अंतर पडले आहे. एखादे वाहन डांबरी रस्त्याच्या खाली उतरल्यास ते उलटण्याचा धाेका आहे.
गडचिराेली-आरमाेरी या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. हा मार्ग पुढे नागपूरकडे जात असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. छत्तीसगड राज्यातून तेलंगणात राज्यात जाणारी जड वाहने याच मार्गाने जातात. परिणामी जड वाहनांचीही वर्दळ राहते. ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या मार्गाची नेहमीच डागडुजी किंवा नूतनीकरण केले जाते. मार्गावर डांबर टाकल्यानंतर मार्गाची उंची वाढते. त्यामुळे डांबराच्या बाजूला मुरूम टाकणे आवश्यक राहते. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर मुरूम टाकण्यात आले नाही. त्यामुळे डांबरी रस्ता व बाजूचा रस्ता यांच्या उंचीत बरेच अंतर पडले आहे. काही ठिकाणी बाजूच्या रस्त्यापासून डांबरी रस्ता एक फूट उंच झाला आहे. दाेन माेठी वाहने समाेरासमाेर येऊन आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास वाहन डांबरी रस्त्याच्या खाली उतरवावे लागते. त्यावेळी वाहन उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिराेली शहरापासून कठाणी नदीपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला काही दिवसांपूर्वी मुरुमाचे ढीग टाकण्यात आले. मात्र हा मुरूम अजूनपर्यंत पसरविण्यात आला नाही. या मुरुमाच्या ढिगावरच वाहने चढून अपघात हाेण्याची शक्यता आहे.