कडेच्या वाहनांमुळे अपघाताचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:23+5:302021-03-10T04:36:23+5:30

खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास ...

Accident due to side vehicles | कडेच्या वाहनांमुळे अपघाताचा धाेका

कडेच्या वाहनांमुळे अपघाताचा धाेका

Next

खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले

गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी आरोग्य धोक्यात आले आहे.

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.

हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून तो भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.

विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर

आष्टी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना

कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र वीज बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीज पुरवठा आवश्यक झाला आहे.

प्लॅस्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लॅस्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पर्यटनस्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष

सिरोंचा : तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून हजारो भाविक उपस्थित राहतात. सोमनूरचा विकास करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : आदिवासीबहूल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा

गडचिरोली : शहरात विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे.

दुर्गम भागात कर्मचारी राहतच नाहीत

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त

कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.

चपराळा येथे सोयीसुविधा पुरवा

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.

हूक टाकून विजेची चोरी सुरूच

वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे.

उपाहारगृहांमधील पदार्थ उघड्यावरच विक्रीला

गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृहे व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे अन्न व पुरवठा विभागातर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडतोड झालेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळे गायी-बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत.

जाेगीसाखरा परिसरात रस्त्यांची दुरवस्था

जाेगीसाखरा : परिसरातील अनेक गावांना जाेडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस

मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

भामरागड तालुक्यात लाईनमनची पदे भरा

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.

नागाेबा देवस्थान दुर्लक्षित

गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.

विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच

कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.

पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा

गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.

पर्यटनस्थळांचा विकास रखडला

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत. पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत सोयीसुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत आहे.

याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डांसाची पैदास वाढला आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.

मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

गडचिरोली : रबी हंगामातील हमखास व अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला ओळखले जाते. मागील पाच वर्षात जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करुन मक्याची लागवड करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

Web Title: Accident due to side vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.